नवे दानवाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
नवे दानवाड (प्रतिनिधी):
येथील समता युवा क्रीडा मंडळ व समस्त बौद्ध समाज, नवे दानवाड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय महोत्सवाला अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वच्छता अभियान आणि सांस्कृतिक उपक्रम
कार्यक्रमाचा शुभारंभ ११ एप्रिल रोजी सकाळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला. जयंती उत्सवाचे सामाजिक भान जपत गावात ‘ग्रामस्वच्छता अभियान’ राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. रात्री लहान मुलांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व महापुरुषांच्या वेशभूषा स्पर्धेने उपस्थितांची मने जिंकली.
क्रीडा स्पर्धा आणि महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’
१२ एप्रिल रोजी सकाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धावणे आणि ‘स्लो सायकल’ स्पर्धेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रात्री कोल्हापूरचे प्रसिद्ध सूत्रसंचालक विवेक मिठारे (खेबवडे) यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी ‘लय भारी होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेतील विजेत्यांना पैठणी, कुकर, इस्त्री यांसह १० आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
’तुफानातले दिवे’ आणि आतषबाजी
१३ एप्रिल रोजी सकाळी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून स्पर्धेत सहभाग नोंदवला. रात्री ८ वाजता ‘कोळप बंधू’ प्रस्तुत ‘तुफानातले दिवे’ हा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. गीतांच्या या जागरा नंतर, मध्यरात्री ठीक १२ वाजता भव्य दिव्य आतषबाजी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
मुख्य दिनी भव्य मिरवणूक व अन्नदान
जयंतीच्या मुख्य दिवशी, १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उत्साही वातावरणात ‘भीम ज्योतीचे’ आगमन झाले. सकाळी ९ वाजता गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर १०:३० ते १:३० या वेळेत भव्य अन्नदान कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या चारही दिवसांच्या कार्यक्रमात नवे दानवाड परिसरातील आंबेडकरवादी समाजातील वृद्ध, युवक, महिला व मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव यशस्वी केला. अशी माहीती जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष व नवे दानवाड गावचे उपसरपंच प्रशांत कांबळे यांनी दिली .
