राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाडमध्ये जल सत्याग्रह आंदोलनाचा दुसरा दिवस

राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाडमध्ये जल सत्याग्रह आंदोलनाचा दुसरा दिवस

‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाडमध्ये जल सत्याग्रह आंदोलनाचा दुसरा दिवस

नवे दानवाड (प्रतिनिधी) :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात आणि दानवाड पंचक्रोशीतील पाणीपुरवठा, कृषी, सिंचन व विकासात्मक मागण्यांसाठी दानवाड येथील मारुती मंदिरासमोर सुरू असलेले ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही अत्यंत आक्रमक व गांभीर्याने सुरूच आहे. या आंदोलनाची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन निवेदन स्वीकारले आहे.

दानवाड पंचक्रोशीतील जलसुरक्षा, शेती आणि भविष्यातील विकासाचे रक्षण करण्यासाठी राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती, दानवाड पंचक्रोशीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण, तसेच ९ ते ११ ऑगस्ट २०२६ दरम्यान जुने दानवाड येथे तीन दिवसांचे उपोषण करण्यात आले होते; मात्र प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी आता बेमुदत सत्याग्रहाचा मार्ग पत्करला आहे.
सन २००२ मधील शिरढोण-टाकवडे कराराच्या धर्तीवर महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनमधून जुने व नवे दानवाड ग्रामपंचायतीला २४ तास शुद्ध आणि मोफत नळ पाणी पुरवठा जोडणी देण्यात यावी.
महसूल व आर्थिक सुरक्षा: महापालिकेने उपसलेल्या पाण्याच्या वापरावर १५% ते २०% जलपट्टी हिस्सा (रॉयल्टी) ग्रामपंचायतींना वर्ग करावा आणि ‘अमृत २.०’ किंवा विशेष अनुदानांतर्गत विकासासाठी स्वतंत्र निधी आरक्षित ठेवावा.
जानेवारी ते जून दरम्यान शेतीपंप धारकांवर लादली जाणारी पाणी उपसा बंदी कायमस्वरूपी रद्द करावी, बाधित शेतकऱ्यांना १००% अनुदानावर सौर कृषीपंप किंवा वीज बिलात पूर्ण सबसिडी द्यावी, तसेच संगम क्षेत्रातील के. टी. वेअर बंधाऱ्यांची निर्माण करावे.
महापालिका, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायतींमध्ये निबंधक कार्यालयात कायदेशीर नोंदणीकृत करार केला जावा. कराराची अंमलबजावणी न झाल्यास पाणी उपसा रोखण्याचा अधिकार ग्रामपंचायतीकडे असावा.
पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोल्हे यांची आंदोलकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. तसेच आज आंदोलन स्थळाला दानवाड गावच्या महसूल अधिकारी तथा तलाठी संपदा कारंडे, ग्रामविकास अधिकारी सारिका मोठे आणि पोलीस पाटील स्वाती कुन्नुरे यांनी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या व भावना समजून घेतल्या आणि निवेदन स्वीकारले.
यावेळी राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समितीचे प्रमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात भरमगोंडा पाटील, नवे दानवाडचे माजी सरपंच संजय धनगर, जुने दानवाडचे माजी सरपंच सुकुमार पाटील, मोहन परीट, सुरेश परीट, बाबासो कुन्नुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती शिरोळचे संचालक सज्जनसिंग रजपुत, बापुसो कुंभोजे, सचिन अंबुपे, अशोक पाटील आणि पँथर आर्मी प्रमुख संतोष दादा आठवले यांच्यासह प्रमुख आंदोलक व ग्रामस्थ उपस्थित होते.
जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत आणि कायदेशीर त्रिपक्षीय करार होत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे कोणतेही काम सुरू करू नये, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *