7th Pay Commission: केंद्राकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ

7th Pay Commission: केंद्राकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ

केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्माचऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलीय. याचसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर गेला आहे. हा निर्णय जानेवारी २०२२ पासून लागू केला जाणार आहे.

या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या तब्बल ४७.६८ लाख कर्मचाऱ्यांना आणि ६८.६२ लाख पेशनर्सला होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर प्रत्येक वर्षी ९५४४.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
जानेवारी ते जुलै दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोनदा अपडेट केला जातो. महागाई भत्त्याची गणना सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनासह गुणाकार करून केली जाते. सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो.

कर्मचार्‍यांना त्यांच्या राहणीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं महागाईच्या या दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या नऊ दिवसांत आठ हप्त्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५.६० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे महागाई वाढणार हे जवळपास निश्चित आहे.

किती फायदा मिळणार?

गेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए १७ टक्क्यांवरून थेट २८ टक्के केला होता. ऑक्टोबर महिन्यात त्यात पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली. आता हाच महागाई भत्ता ३४ टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्ता वाढल्यानंतर १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर ६१२० रुपयांची वाढ प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळेल. त्याचप्रमाणे, कमाल वेतन स्लॅबमधील कर्मचाऱ्यांचा डीए वाढून १९,३४६ रुपये प्रति महिना होईल.
केंद्र सरकारनं आपल्या कर्मचार्‍यांना १८ महिन्यांपासून म्हणजे १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत महागाई भत्ता दिलेला नाही. अनेक दिवसांपासून कर्मचारी हा थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *