मंदिरात चोरीप्रकरणी हुसेन मुजावर व शहारूख जमादार यांचा वर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
इचलकरंजी / प्रतिनिधी –
कबनुर (ता. हातकणंगले) येथील धुळेश्वरनगरमधील तुळजाभवानी मंदिरातून पितळी घंटा चोरीला गेल्याप्रकरणी संबंधित चोर आणि चोरीची वस्तू खरेदी करणाऱ्या भंगार व्यापाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून गुन्हा नोंदवला जात नसल्याने तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
▪️नेमकी घटना काय?
कबनूर (ता. हातकणंगले) येथील धुळेश्वरनगरमध्ये तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील पितळी घंटा येथील हुसेन मुजावर यांने चोरली होती. ही चोरीची घंटा त्याने भंगार व्यापारी शाहरुख जमादार याला विकली.
घंटेची चोरी झाल्याचे आणि चोर तसेच भंगार व्यापाऱ्याची माहिती असूनही, या दोन्ही व्यक्तींविरोधात अद्याप शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती तक्रारदाराने दिली आहे.
उच्चस्तरीय तक्रार दाखल
याबाबत स्थानिक रहिवासी सुनील विठ्ठल रायबागे (रा. विक्रम नगर, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांनी हे प्रकरण उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
रायबागे यांनी थेट मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि प्रांताधिकारी यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. मंदिरातील पवित्र वस्तूची चोरी करणारे मुजावर आणि चोरीची वस्तू खरेदी करणारे जमादार यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा भाविक व्यक्त करत आहेत.