कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा दणका; तलाठी आणि उपसरपंच ५,००० रुपयांची लाच घेताना जाळ्यात
कोल्हापूर | प्रतिनिधी
जमिनीच्या ७/१२ पत्रकावर वडिलांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५,००० रुपये स्वीकारणाऱ्या शिंगणापूर येथील तलाठ्यासह उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार (वय ३४) यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वडिलांचे नाव लावण्यासाठी शिंगणापूर येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) इरफान दिलावर सनदी (वय ४१) यांनी १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ४ मार्च २०२६ रोजी एसीबी कोल्हापूर विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एसीबीकडून पडताळणी आणि सापळा
तक्रारीची दखल घेत विभागाने बुधवारी पडताळणी केली असता, आरोपी तलाठी इरफान सनदी यांनी स्वतःसाठी आणि उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (वय ४३) यांच्यामार्फत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ५,००० रुपये देण्याचे ठरले आणि ही रक्कम ५ मार्च रोजी शिंगणापूर तलाठी कार्यालयात घेऊन येण्यास सांगण्यात आले.
आज (गुरुवार) दुपारी सापळा रचला असता, तलाठी सनदी यांच्या सांगण्यावरून उपसरपंच दीपक कांबळे यांनी तक्रारदाराकडून ५,००० रुपये स्वीकारले. लाचेची ही रक्कम कार्यालयाशेजारील रूममधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगण्यात आली होती. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.
घरझडती आणि पुढील कारवाई
एसीबीने आरोपींच्या ताब्यातील मोबाईल फोन आणि लाचेची रक्कम जप्त केली आहे. सध्या आरोपींच्या शिंगणापूर आणि कोल्हापूर (लाइन बाजार) येथील निवासस्थानी घरझडती घेण्याचे काम पथकांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया:
दोन्ही आरोपींविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि ७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई पथक:
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, पोलीस कर्मचारी संदीप काशिद, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील आणि चालक गजानन कुराडे यांच्या पथकाने केली
