बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शालेय साहित्य खरेदीच्या निविदेतील पारदर्शकतेबाबत निवारा बांधकाम कामगार संघटनेचे शासनाला निवेदन!
२५ कोटी रुपये अनामत रक्कम व ५ लाख रुपये निविदा शुल्क निश्चित करण्यामागील कारणांची चौकशी करा; निविदा प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी!
सांगली, दि. २५ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजने’अंतर्गत शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या निविदा प्रक्रियेतील आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय बाबींमध्ये पूर्ण पारदर्शकता असावी, तसेच बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी जमा झालेल्या सार्वजनिक उपकर निधीचा योग्य व काटकसरीने विनियोग व्हावा, या मागणीसाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, मुख्य सचिव, कामगार विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांना सविस्तर निवेदन ई-मेलद्वारे पाठविले आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी २२ प्रकारच्या वस्तूंचा संच देण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.
मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये निविदेची अंदाजित किंमत, वस्तूनिहाय दर, वस्तूंची गुणवत्ता, एकूण लाभार्थी संख्या, वाहतूक व वितरण खर्च याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे निविदेसाठी २५ कोटी रुपये अनामत रक्कम (EMD) आणि ५ लाख रुपये निविदा शुल्क निश्चित करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक अटी निश्चित करण्यामागील आधार काय आहे? या अटींमुळे लहान व मध्यम पुरवठादारांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास अडथळा निर्माण होणार नाही ना? असे महत्त्वाचे प्रश्न संघटनेने उपस्थित केले आहेत.
संघटनेने आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत.
१. निविदा प्रक्रियेतील आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित करावी.
२. निविदेची अंदाजित किंमत, वस्तूनिहाय दर, लाभार्थी संख्या, गुणवत्ता निकष, वितरण खर्च, २५ कोटी रुपये EMD आणि ५ लाख रुपये निविदा शुल्क निश्चित करण्यामागील कारणे सार्वजनिक करावीत.
३. निविदा प्रक्रियेत अवाजवी अटी किंवा त्रुटी आढळल्यास सदर निविदा रद्द करून पारदर्शक व खुली सुधारित निविदा प्रक्रिया राबवावी.
४. वस्तू संच देण्याऐवजी पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना थेट शैक्षणिक आर्थिक सहाय्य अथवा शिष्यवृत्ती द्यावी.
५. संपूर्ण खरेदी, पुरवठा व वितरण प्रक्रियेचे लेखापरीक्षण करून खर्चाचा आणि प्रत्यक्ष वितरणाचा तपशील सार्वजनिक करावा.
६. निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची माहिती संघटनेला लेखी स्वरूपात द्यावी.
कॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले की,
बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, कामगारांच्या कल्याणासाठी जमा झालेला हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करताना कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शिष्यवृत्ती अथवा थेट आर्थिक सहाय्य दिल्यास विद्यार्थ्यांना आपल्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य खरेदी करता येईल. त्यामुळे वस्तू संच खरेदी व वितरण प्रक्रियेतील खर्च आणि पारदर्शकतेचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.
संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की, या प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा.
बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य, सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग आणि निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता यासाठी निवारा बांधकाम कामगार संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील.
कॉ. शंकर पुजारी
अध्यक्ष
निवारा बांधकाम कामगार संघटना
सांगली.
