घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला गांधीनगर पोलिसांकडून अटक,१२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला गांधीनगर पोलिसांकडून अटक,१२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला गांधीनगर पोलिसांकडून अटक,

१२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर,दि.८ ( प्रतिनिधी) पतीच्या मामाच्या घरी विवाह सोहळ्यासाठी आलेल्या एका महिला नातेवाईकानेच घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गांधीनगर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत तपास करत पौर्णिमा विशाल पाटील (वय २७, रा. रामनगर आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) या महिला आरोपीला अटक केली आहे. तिच्याकडून गुन्ह्याच्या तपासादरम्यान १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी स्वप्नाली श्रेयांश बेले (वय ३२, रा. हडपसर, पुणे) या वळिवडे येथील चिंचवाड रोडवरील आपल्या पतीच्या मामाच्या घरी विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, आरोपी महिला पौर्णिमा पाटील हिने घरातील बेडरूममधून फिर्यादी यांच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे ६ बांगड्या, मंगळसूत्र व राणीहार असा एकूण १५ लाख ३० हजार रुपये किमतीचा १५० ग्रॅम वजनाचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिला आरोपी पौर्णिमा पाटील हिचा शोध घेतला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेने हे चोरीचे दागिने कर्नाटक राज्यातील शिरसी येथील एका ज्वेलर्स दुकानामध्ये विकले होते. त्या पैशांमधून तिने स्वतःसाठी खरेदी केलेले सोन्याचे मोठे गंठण, मिनी मंगळसूत्र, कानातील झुमके, ज्युपिटर मोटरसायकल, विवो मोबाईल, आयएफबी कंपनीचा फ्रीज, दोन सिलाई मशीन आणि आरोपीच्या बहिणीच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केलेली व रोख स्वरूपातील २ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम असा एकूण १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गांधीनगर पोलिसांनी आरोपी महिला पौर्णिमाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्‍णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *