सांगलीत ३५७ बेघर कुटुंबांवर अन्याय; दरमहा ५ हजार रुपयांप्रमाणे ३.६० लाखांच्या घरभाडे भरपाईची मागणी

सांगलीत ३५७ बेघर कुटुंबांवर अन्याय; दरमहा ५ हजार रुपयांप्रमाणे ३.६० लाखांच्या घरभाडे भरपाईची मागणी

सांगलीत ३५७ बेघर कुटुंबांवर अन्याय; दरमहा ५ हजार रुपयांप्रमाणे ३.६० लाखांच्या घरभाडे भरपाईची मागणी

  • ६ वर्षांपासून ताबा न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बेघर वंचित
  • ३१ ऑक्टोबरला निवारा भवन येथे पुढील बैठकीचे आयोजन

सांगली (विशेष प्रतिनिधी): सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने घरांचे वाटप केल्याचे ठराव मंजूर करून तसेच सदनिकांच्या मालकीची प्रमाणपत्रे देऊनही गेल्या सहा वर्षांपासून प्रत्यक्षात ३५७ बेघर कुटुंबांना घरांचा ताबा दिलेला नाही, असा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर २०२० पासून आजपर्यंतच्या सहा वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा ₹५,००० या दराने प्रत्येक कुटुंबाला ₹३ लाख ६० हजार रुपये घरभाडे नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत, अशी ठाम मागणी सांगली निवारा भवन येथे आयोजित बेघरांच्या व्यापक बैठकीत करण्यात आली. कॉम्रेड शंकर पुजारी यांनी ही माहिती दिली.

बैठकीत बोलताना कॉ. शंकर पुजारी म्हणाले की, “गेल्या ३१ वर्षांपासून संघटनेच्या वतीने बेघरांना हक्काची घरे मिळावीत यासाठी लढा सुरू आहे. न्यायालयाचा स्पष्ट निकाल लागलेला असतानाही महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक हा प्रश्न न सोडवता बेघरांवर अन्याय करत आहे.”

उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश तरीही बेघर वंचित

सांगली शहरातील बेघरांना घरे मिळावीत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक ३४१२/२०१५ दाखल करण्यात आली होती. त्यावर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाने महापालिकेला १३,००१ बेघरांना घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर महानगरपालिकेने १८ सप्टेंबर २०२० रोजी ठराव क्रमांक ४१ आणि २० जून २०२२ रोजी ठराव क्रमांक २३२ मंजूर केला. एवढेच नव्हे तर काही लाभार्थ्यांना सदनिकांच्या मालकीची प्रमाणपत्रेही देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष घरांचा ताबा मात्र अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कागदी कारभारावर बेघरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आरक्षित जागेबाबत प्रश्न आणि चौकशीची मागणी

सांगली येथील सर्किट हाऊस परिसर आणि आयुक्तांच्या बंगल्याच्या जागेबाबतही बेघरांच्या वतीने बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ही जागा मूळची बेघरांच्या घरांसाठी आरक्षित असल्याचा दावा करण्यात आला असून, या जागेचा प्रश्न तात्काळ सोडवून पात्र बेघर कुटुंबांना तेथे घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. या आरक्षित जागेच्या प्रश्नाची सखोल चौकशी व्हावी, असा सूर बैठकीत उमटला.

आगामी बैठक ३१ ऑक्टोबर रोजी

या सर्व प्रश्नांची तीव्रता लक्षात घेता पुढील रणनीती ठरवण्यासाठी शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी निवारा भवन येथे पुढील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण व्यापक बैठकीस कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, शिराज शेख, श्रीधर रानडे, मुमताज शेख, हिराबाई तुपे, सुनंदा पवार, हिराबाई चिनके यांच्यासह बहुसंख्येने बेघर नागरिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *