रोहित पठारे यांच्यावरील अमानुष खूनी हल्ल्याचा शिरोळ तालुक्यात तीव्र निषेध
हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याची आंबेडकरवादी पक्ष-घटनांची मागणी

शिरोळ : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे बौद्ध समाजाचे कार्यकर्ते रोहित पठारे यांच्यावर अमानुष मारहाण करून निर्घृण खून करण्यात आल्याच्या घटनेचा शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी पक्ष व संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी विशेष पथकाद्वारे अथवा सीबीआय (CBI) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन सोमवारी शिरोळच्या प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील यांना देण्यात आले. रोहित पठारे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच पीडिताला न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच तहसीलदार क्रांती पाटील यांनी निवेदनामधील मागण्या व भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या घटनेमुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आंदोलनामध्ये भिमा कोरेगाव वीर सिद्धनाक यांचे वंशज प्रमोद इनामदार, पँथर आर्मी प्रमुख संतोष आठवले,
आंदोलन सम्राट आदम मुजावर,ज्येष्ट नेते रमेश शिंदे, पीआरपी चे बाळासाहेब कांबळे, धम्मपाल ढाले, सुरज शिंगे, जी.डी. चव्हाण, अनिल लोंढे, श्रीकांत सिंगाई, सेनापती भोसले, सुरज कांबळे, आयुब पट्टेकरी, बाळासो कांबळे, संजय शिंदे, अप्पासो बंडगर, राजेंद्र प्रधान, विनायक कांबळे, विश्वास शिंगे, सुरेश कांबळे, किरण शिंदे, चिंतामणी कांबळे, खंडेराव कांबळे, विक्रम माने, दीपक कांबळे, संजय कांबळे, दिनेश कांबळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
