राजापूर बंधाऱ्यावरील लोखंडी बरगे चोरीप्रकरणी एकाला अटक; ६.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्याच्या (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) गाळ्यांमधील लोखंडी बरगे चोरीप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले २१ लोखंडी बरगे आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण ६ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
घटनेचा तपशील
राजापूर गावच्या हद्दीत कृष्णा नदीवरील बंधाऱ्याच्या एकूण ६५ गाळ्यांपैकी २१ लोखंडी बरगे अज्ञात चोरट्यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजेपूर्वी चोरून नेले होते. याप्रकरणी पाटबंधारे विभागातील कर्मचारी दादासो आनंदा पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) प्रमाणे दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.२९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे आणि अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अंमलदार अविनाश भोसले यांना गोपनीय बातमीदाराद्वारे चोरीचे बरगे ‘महिंद्रा पिकअप मॅक्स’ या चारचाकी वाहनातून नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळापासूनचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यात आले आणि त्यावरून संशयित वाहनाची ओळख पटली.
मिळालेल्या तपासाच्या आधारे अनिल आकाराम पुजारी (वय २७, रा. मंगेश्वरनगर, कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने त्याचा साथीदार अमोल गुंडू नंदीवाले (रा. मंगेश्वरनगर, कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्या मदतीने राजापूर बंधाऱ्यातील २१ लोखंडी बरगे चोरल्याची कबुली दिली.
६.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक फरार
अटक आरोपी अनिल पुजारी याने लपवून ठेवलेले २१ लोखंडी बरगे पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली व आरोपीच्या मालकीची महिंद्रा पिकअप मॅक्स (क्र. MH-10-DT-5039) ही गाडीही जप्त करण्यात आली आहे. एकूण ६,९४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीस दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आले होते.
दरम्यान, गुन्ह्यातील दुसरा आरोपी अमोल गुंडू नंदीवाले हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार अ. डोईजड, पोउपनि जीवन पाटील, पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, निलेश भोसले, अविनाश भोसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
