बुद्धांचे विचार देशाला तारणारे; निपाणीत तिसरी ‘धम्म परिषद’ उत्साहात संपन्न

बुद्धांचे विचार देशाला तारणारे; निपाणीत तिसरी ‘धम्म परिषद’ उत्साहात संपन्न

बुद्धांचे विचार देशाला तारणारे; निपाणीत तिसरी ‘धम्म परिषद’ उत्साहात संपन्न

निपाणी: प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी महोत्सव आणि भारतीय बौद्ध महासभा, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने निपाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात १ मार्च रोजी तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध व्याख्याते आणि ‘जग बदलणारा बाप माणूस’ या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहाळ (पुणे) यांनी “बुद्धांचे विचार देशाला तारणारे आहेत,” असे प्रतिपादन केले.

जातीव्यवस्थेच्या उतरंडीला छेद

​कार्यक्रमाचे उद्घाटन ता.प. कार्यनिर्वाहक प्रवीण कट्टी यांच्या हस्ते, जातीव्यवस्थेची उतरंड दर्शविणारे मडके फोडून करण्यात आले. या प्रतिकात्मक कृतीतून समतेचा संदेश देण्यात आला.

प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन

​मुख्य वक्ते जगदीश ओहाळ म्हणाले की, “काही मनुवादी प्रवृत्तींनी बुद्धांचे विचार गाडण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे तत्त्वज्ञान नव्याने समाजासमोर उभे केले. सम्राट अशोक आणि बाबासाहेबांनी बुद्धांचा विचार जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. आज देशात जाती-धर्माच्या नावाने राजकारण करून फूट पाडली जात असताना, गावागावांत बाबासाहेबांचे विचार जागविणारे अनुयायी तयार होणे काळाची गरज आहे.”

​प्रा. डॉ. अच्युत माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “धम्म म्हणजे केवळ श्रद्धा नसून ती जगण्याची एक शिस्तबद्ध पद्धत आहे. जग आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना, शांततेचा मार्ग केवळ गौतम बुद्धच दाखवू शकतात. आपण धर्म आणि संविधान या दोन शक्तींच्या आधाराने कार्यरत राहिले पाहिजे.”

निपाणी: आंबेडकरी चळवळीचे केंद्र

​धम्म परिषद समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी निपाणीच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “निपाणी ही भूमी आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असून, डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने आठ वेळा पावन झाली आहे. नव्या पिढीपर्यंत समतेचा संदेश पोहोचवण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.”

उपस्थित मान्यवर

​या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, उत्तर कर्नाटकचे मनोहर मोरे होते. भंते ज्ञानज्योती (बेळगाव) व भंते नवापाल करुणा (भालकी) यांनी बुद्ध वंदना सादर केली. यावेळी भंते करूनानंद, परशुराम कर्निंग, अरविंद घटी, राजेंद्र वडर, प्रा. जे. डी. कांबळे, प्रा. डॉ. आर. के. दिवाकर, लता नडोणी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व धम्मबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत राहुल शितोळे यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *