हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश: करवीर पोलिसांची धडक कारवाई, लॉजमालकासह दोघे अटकेत
क्राईम स्पेशल : अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. २२ (प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्ह्यात खाकीचा सखा बडगा उगारत करवीर पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. वाशी हद्दीतील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, लॉजमालकासह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातून अवैध वेश्याव्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना वाशी गावातील ‘स्वयंभू लॉजिंग’ येथे हायप्रोफाईल रॅकेट सुरू असल्याबाबत खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली.
असा उघड झाला काळाबाजार
छापादरम्यान पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या विळख्यातून एका पीडित महिलेची सुटका केली. कसून चौकशी केली असता, या महिलेला कोल्हापूर येथे आणून पुणे-बंगळूर महामार्गावरील कणेरीवाडी येथील लॉजमध्ये ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
तपासात सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याने या महिलेला फूस लावून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह स्वयंभू लॉजचे मालक अमोल श्रीपती खोत (वय ४०, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटचे जाळे कुठेकुठे पसरले आहे, याचा कसून तपास करवीर पोलीस करत आहेत.
पोलीस पथकाची धाडसी कामगिरी
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने पार पाडली:
- पोलिसांचे पथक: पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सुहास पवार, फौजदार राहुल देसाई, पोहेकॉ. विजय तळसकर आणि पोहेकॉ. अविनाश कांबळे.
