कोल्हापुरात ‘गोवा दारू’चा मोठा साठा जप्त; वळीवडेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरारक छापा!

कोल्हापुरात ‘गोवा दारू’चा मोठा साठा जप्त; वळीवडेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरारक छापा!

कोल्हापुरात ‘गोवा दारू’चा मोठा साठा जप्त; वळीवडेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरारक छापा!

अमोल कुरणे ( विशेष प्रतिनिधी )

कोल्हापूर: कोल्हापूरच्या वळीवडे परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. गोव्यातून तस्करी करून आणलेल्या विदेशी दारूचा मोठा साठा आणि त्यासोबतचे लाखो रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

असा झाला पर्दाफाश

​मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने करवीर तालुक्यातील वळीवडे येथील शांती प्रकाश कॉलनी परिसराची नाकेबंदी केली. संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका टाटा एसीई पिकअप वाहनाची (क्र. एमएच-०९-एफएल-७५४२) तपासणी केली असता, त्यात दारूचा साठा लपवून ठेवल्याचे उघड झाले.

९ लाखांचा ऐवज जप्त; एक अटकेत

​या कारवाईत पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या एकूण ५५२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या दारूची किंमत ५ लाख ६० हजार ८८० रुपये इतकी आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेले ४ लाख रुपयांचे वाहनही जप्त करण्यात आले असून, एकूण ९ लाख ६० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विजय महादेव माने (वय ४६, रा. दत्त कॉलनी, वळीवडे) याला बेड्या ठोकल्या आहेत.

कोणाचे होते नेतृत्व?

​ही थरारक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून ही कारवाई फत्ते केली.

गुन्हेगारांचे धाबे दणाणले:

तस्करांनी दारू विक्रीसाठी वळीवडे परिसराची निवड केली होती, मात्र उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या काही तासांत त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. आता आरोपी विजय मानेकडून दारूच्या या रॅकेटमधील आणखी कोणकोणते चेहरे समोर येतात, याकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.

​सध्या या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे हे करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *