नवे दानवाड |
२० जुलै २०२६
शिरोळ तालुक्यातील कृष्णा-दूधगंगा नदीकाठच्या दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रस्तावित ८९ एमएलडी ‘राधाकृष्ण पाणी पुरवठा योजने’ला कडाडून विरोध दर्शवला आहे. या योजनेमुळे स्थानिक शेती, जलसंधारण आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, ‘राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती’ने ही योजना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महादेव कदम यांना देण्यात आले
“ही योजना केवळ इचलकरंजीसाठी नाही, तर आमच्या हक्काच्या पाण्यावर आणि शेतीच्या अस्तित्वावर घाला आहे. आम्ही याला कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” – समितीचा इशारा.
प्रस्तावित उद्भव क्षेत्राजवळच कर्नाटकची ‘महालक्ष्मी योजना’ कार्यरत असल्याने, दोन्ही योजनांमुळे उन्हाळ्यात कृष्णा – दूधगंगा नदी कोरडी पडण्याची भीती आहे, ज्यामुळे सीमावर्ती जलतंटा निर्माण होऊ शकतो.
स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी काळम्मावाडी प्रकल्पासाठी संपादित केल्या असतानाही, त्यांनाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
योजनेला कडाडून विरोध का?
जुनेदानवाड, नवे दानवाड ,दत्तवाड, सै.टाकळी,घोसरवाड ,राजापूरवाडी आणि खिद्रापूर यांसारख्या गावांची अर्थव्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णपणे कृष्णा आणि दूधगंगा नदीवर अवलंबून आहे. ही योजना राबवल्यास नदीपात्र कोरडे पडण्याची आणि भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. समितीच्या मते, हा केवळ विकासकामाचा प्रश्न नसून, त्यांच्या हक्काच्या पाण्यावर आणि शेतीच्या अस्तित्वावरचा हा घाला आहे.
प्रशासनाला इशारा
या योजनेविरोधात स्थानिक ग्रामसभांमध्ये आधीच ठराव मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांना कायदेशीर हरकती सादर केल्या आहेत. “जर प्रशासनाने या योजनेचा पुनर्विचार करून ती रद्द केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे ‘जलआक्रोश जनआंदोलन’ आणि ‘साखळी उपोषण’ छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा समितीने दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली अधीक्षक अभियंता व शिरोळ तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले
हे निवेदन सादर करताना लोकनियुक्त सरपंच सी. डी. पाटील, ॲड. राहुलराज कांबळे, माजी सरपंच संजय धनगर, संतोष आठवले, श्रावण कांबळे, शिवानंद माळी, सद्दाम सनदी, सज्जनसिंग राजपूत, सुकुमार पाटील, मारुती कांबळे, सागर परिट, सदाशिव गिड्ड, महादेव बेरड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या या प्रकरणावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका जाहीर झालेली नसून, ग्रामस्थांच्या कायदेशीर लढायाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
