डॉ. दिनेश बारी यांना भारत सरकारचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर
२१ वर्षांच्या निष्कलंक व उल्लेखनीय सेवेची राष्ट्रस्तरावर दखल
कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि संवेदनशीलता जपत उत्कृष्ट सेवा बजावणारे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश गिरधर बारी यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस दलातील त्यांच्या सलग २१ वर्षांच्या निष्कलंक व उल्लेखनीय सेवेची ही राष्ट्रीय पातळीवरील गौरवशाली पोचपावती ठरली आहे.
डॉ. दिनेश बारी यांनी २४ मे २००५ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावरून सेवेस प्रारंभ केला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अत्यंत संवेदनशील व आव्हानात्मक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
महत्त्वाच्या सेवा व कार्यभार:
- नक्षलग्रस्त क्षेत्र: गोंदियासारख्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रभावी कामगिरी (विशेष सेवा पदक – २०११).
- विविध पदे व विभाग: छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), राज्य राखीव पोलीस दल (SRPF), कोल्हापूर, गुन्हे अन्वेषण विभाग (CID).
- ‘फोर्स वन’ मुंबई: नोव्हेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत मुंबई येथील नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र (UCTC), ‘फोर्स वन’ येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा.
प्रशिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक योगदान
‘फोर्स वन’मधील कार्यकाल दरम्यान त्यांनी दहशतवादविरोधी प्रशिक्षण, कमांडो प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात नवे मापदंड प्रस्थापित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाने पाच स्पर्धा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. तसेच ‘एआयपीडीएम’ (AIPDM) स्पर्धेतही त्यांच्या नेतृत्वाखालील संघाने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण व कांस्य पदक पटकावत राज्याचा लौकिक वाढवला.
कोल्हापूरकरांचे ‘देवमाणूस’
कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच सामान्य नागरिकांच्या अडीअडचणींना नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या धाडसी, तरीही अत्यंत संवेदनशील कार्यशैलीमुळे कोल्हापूरच्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी अकृत्रिम आदर निर्माण झाला असून, नागरिक त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखतात.
पूर्वी मिळालेले प्रमुख पुरस्कार व सन्मान:
- विशेष सेवा पदक (नक्षलग्रस्त भाग): २०११
- अंतर्गत सुरक्षा विभाग सेवा पदक: २०१४
- फोर्स वन विशेष सेवा पदक: २०१५
- महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह: २०२२
- डीजीपी, सीआरपीएफ (CRPF) कडून ‘कॉमनडेशन बॅच’
- सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचा प्रतिष्ठित ‘टाक बॅच’
दोन दशकांहून अधिक काळ देश व राज्याच्या सुरक्षेसाठी समर्पित राहिलेले डॉ. दिनेश बारी यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल महाराष्ट्र पोलीस दलासह विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
