पूर्वजांची फसवणूक करून धनदांडग्यांनी बळकावलेली जमीन परत मिळवण्यासाठी भूमी संपादन आंदोलन – प्रा. शहाजी कांबळे

कोल्हापूर, दि.२ (प्रतिनिधी)
मागासवर्गीय समाजाच्या उदरनिर्वाहासाठी कसून खाण्याकरिता मिळालेली वतनी जमीन काही धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे बळकावली आहे. पूर्वजांच्या अडाणीपणाचा फायदा घेत अगदी किरकोळ कारणांसाठी लाटलेली जमीनी परत मिळवण्याचे आंदोलन लोकराजा छत्रपती शाहूंच्या भूमीतून सुरू झाले आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली. १ सप्टेंबरपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, आवारात या आंदोलनाची यशस्वी सुरुवात करण्यात आली.
ॲड. पंडितराव सडोलीकर यांच्या संकल्पनेतून सडोली दुमाला येथे ४० वर्षांहून अधिक काळ निवास करणाऱ्या दलितांच्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी प्रा. शहाजी कांबळे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरव यांच्याकडे पहिला प्रस्ताव सुपूर्द केला. यावर सकारात्मक पावले उचलत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचलित कायदे व न्यायालयाच्या निवाड्यांनुसार ही घरकुले नियमानुकूल करण्याचे तातडीचे लेखी आदेश ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील विविध गावांतून धनदांडग्यांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी अनेक प्रस्ताव संघटनेकडे आले असून, लवकरच याविरोधात व्यापक लढा उभारला जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात करण्यात आली. महार वतने, तराळकी, हडळकी व देवस्थान जमिनींवरील अतिक्रमणे हटवून मूळ वतनदारांना जमिनी मिळवून देण्यासाठी लवकरच भव्य महामेळावा आयोजित केला जाणार आहे.
या आंदोलनात संजय जिरगे, डॉ. किशोर सडोलीकर, हरी कुर्डूकर, मल्लीक चिकदुळ, रूपेश आठवले, अलंकार माने, रोहित कांबळे, सिद्धोधन शांतीरत्न, प्रमोद कांबळे, अविनाश कांबळे, भीमराव पांढरबळे, सज्जन कांबळे, ऋषिकेश कांबळे, विमल कांबळे, विनायक कांबळे, पारस कांबळे आणि विनोद कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
