रत्नागिरीतील नामांकित नर्सिंग कॉलेचा गलथान कारभार उघड

रत्नागिरीतील नामांकित नर्सिंग कॉलेचा गलथान कारभार उघड

⭕जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांना भेट दिली मात्र विद्यार्थ्यांना भेट नाकारली…

⭕पोलिस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी

⭕ वसतीगृहाची फी घेत विद्यार्थ्यांना ठेवले खाजगी लॉजवर…

⭕विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करून शिक्षकांच्या होतात पार्ट्या

⭕मेसच्या आहारात सापडतात अळ्या, माश्या

वसुलीबाज कॉलेजवर कायदेशीर कारवाई करा, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेची मागणी

रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट महाविद्यालयाचा गलथान कारभार भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेने उघड केला आहे. विद्यार्थ्यांना २०२०-२१ या वर्षात प्रवेश देण्यात येईल असे सांगून १७ विद्यार्थ्यांना वंचित ठेवून पालकांकडून विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी आणि वसतिगृहाची फी देखील वसूल करण्यात आली, जबरदस्तीने स्वयं घोषित प्रमाणपत्र लिहून घेण्यात आले, योग्य दर्जाचे अन्न न देता शिळे अन्न दिले गेले असे अनेक धक्कादायक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनीष जाधव आणि मार्गदर्शक अमोल बोधिराज यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केले.

यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजमार्फत विद्यार्थ्यांची फसणुकीतून आर्थिक लूट सुरू आहे. विद्यार्थ्याना ज्या सुविधा मिळत नाही त्या सुविधांचे भरमसाठ शुक्ल आकारले जाते. महाविद्यालयातील कर्मचारीवर्ग विद्यार्थ्यांशी उद्दटपणे वागतो, तर शिक्षण संस्थाचालकांचे दर्शन ही अद्याप विद्यार्थ्यांना झालेलं नाही, असे बोधीराज यांनी सांगितले. सन २०२० -२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी ३० विद्यार्थ्याना प्रवेश बंधनकारक असताना ४७ विद्यार्थ्याना प्रवेश का दिला? असा सवाल उपस्थित होत आहे. उर्वरित १७ विद्यार्थी प्रत्यक्षात शिक्षण घेत असेल तरी अंतिम परीक्षेस या विद्यार्थ्याना बसू दिले जाणार नसल्याचे माहित असून देखील महाविद्यालयाने मेस फी, वसतिगृह फी, शैक्षणिक
शुल्क असे सुमारे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दीड लाख रुपये घेतले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फी दिली नाही, त्या विद्यार्थ्यांच्या थेट घरी महाविद्यालयाने वसुली एजेंड पाठविले होते. या सर्व प्रकारातून आज ही १७ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे त्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागत आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थ्याच्या पालकांची आर्थिक लूट करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे.

🔷 वसतीगृहाची फी घेत विद्यार्थ्यांना ठेवले खाजगी लॉजवर…

नर्सिंग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाची फी घेऊन वसतिगृहात न ठेवता एका लॉजवर वास्तव्याला ठेवत होते. यावरून विद्यार्थ्यांची वसतिगृहाच्या नावाखाली संस्थाचालकच फसवणूक करत असल्याचे स्पष्ट होते. खाजगी इमारती, लॉज, हॉटेल इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्याना वास्तव्याला ठेवणे हे बेकायदेशीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत धोकादायक आहे. संस्था व महाविद्यालय बेजबाबदारपणे वागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

🔷विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करून शिक्षकांच्या होतात पार्ट्या

एखादा विद्यार्थी महाविद्यालयीन वेळेत न येता उशिरा आला तर त्यांच्याकडून जबर दंड वसूल केला जातो. जबरदस्तीने विद्यार्थ्याच्या बॅगा तपासून बॅगेत मोबाईल बंद असला तरीदेखील अनधिकृत पावत्या देऊन दंड वसूल केला जातो. अशा दंडाची रक्कम जमा करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पार्ट्या करत असतात, असे विद्यार्थ्यानी यावेळी सांगितले.

🔷मेसच्या आहारात सापडतात अळ्या, माश्या

महाविद्यालयातील मेसच्या जेवणात शिळे अन्न, अळ्या व माश्या पडलेले अन्न खाल्याने विद्यार्थ्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती वरिष्ठांना दिली होती त्यावर कोणतीही कारवाई न करता उलट विद्यार्थ्यांनाच दमदाटी करणे व परीक्षेस बसण्यास मज्जाव करणे असे प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अनेक दिवस अनुभवले आहेत. रात्रीचे जेवण सायंकाळी ५ वाजता विद्यार्थ्यांच्या डब्यात दिले जाते. तसेच जबरदस्तीने मेस लावण्यास भाग पाडून मेसची ‘फि’ विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येते. अशा या वसुलीबाज महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता शासन व प्रशासनाने घ्यावी. अशी मागणी भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेने केली आहे.

🔷जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांना भेट दिली मात्र विद्यार्थ्यांना भेट नाकारली…

जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी स्वतः विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संपर्क करून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता बैठक बोलवली होती. त्याप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी चेंबरमधे पोचले असता विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना थातूरमातूर उत्तरे देत जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट नाकारली. मात्र काही वेळापूर्वी नर्सिंग कॉलेजचे संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी बी एन पाटील यांची भेट घेऊन जवळजवळ अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थी संघटनेची अचानक भेट का नाकारली? असा सवाल विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष मनीष जाधव यांनी उपस्थित केला आहे.

🔷पोलिस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी

रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकांचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी विद्यार्थ्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. याउलट १४९ ची नोटीस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलीस प्रशासनाकडून होत आहे. असा थेट आरोप विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *