बहुजन प्रतिपालक- छत्रपती शिवराय
- डॉ.सोमनाथ कदम
सदस्य, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्य, मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण अनेक अर्थाने मान्य करावे लागेल. मात्र शिवरायांचे सर्वात मोठे व महत्त्वाचे कार्य म्हणजे शिवाजी महाराजांनी जातिप्रथा अमान्य केली. जाती पातीच्या नावावर व्यवस्थेने लावलेले निर्बंध हटवले, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसलेल्या शेकडो जाती जमातींच्या लोकांना स्वातंत्र्य देऊन आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले. तत्कालीन अस्पृश्य आणि आदिवासी असलेल्या जाती व जमातींना शिवाजी महाराजांनी शेतकरी जाती बनविल्या. या संदर्भात ग्रॅण्ड डफचा हवाला देत शरद पाटील म्हणतात,कुणबी व मावळातील कोळी इ. आदिवासी शिवाजीच्या निशाण्याखाली मराठा बनण्यासाठी जमा झाले. कोळयांना सांगण्यात आले की, त्यांनी शेती केली तर त्यांना मराठा कुणबी बनता येईल तर अस्पृश्य समाजाच्या हातात शिवाजी राजांनी प्रथमच तलवार देऊन पारंपारिक संकेत मोडीत काढले. त्यामुळे हजारो वर्षापासून पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या जातींचे लोक स्थिर झाले व नंतरच्या काळात स्वराज्य रक्षणाचे शिलेदार म्हणून पुढे आले.
शिवपूर्वकाळात महाराष्ट्रात अत्यंत ताठर जातिप्रथा समाजात अस्तित्वात होती. त्यामुळे मुठभर राज्यकर्त्या वर्गाचा अपवाद सोडला तर बाकी जनतेची अवस्था “मुकी बिचारी कुणीही हाका” अशीच होती. शिवाजी महाराजांनी ही जातीप्रथा शिथील केली व अस्पृश्य समाजाला सैन्यात प्रवेश दिल्याच्या संदर्भात ‘तारीखे इब्राहीम खान’ या ग्रंथाचा लेखक इब्राहीम खान लिहितो की, “मराठयांचे सैन्य मुख्यत: कुणबी सुतार, वाणी आणि इतर हीन जातींनी बनलेले होते.”
छत्रपती शिवाजीराजांचे राज्य हे सर्वांना आपले वाटले त्याचे कारण शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेला मोठे केले व या सामान्य लोकांनी शिवाजी राजांना मोठे केले. आपल्या राज्यातील कोणत्या जातीच्या लोकांकडून कोणते काम करुन घ्यावे याची पारख त्यांना होती म्हणूनच सभासदाच्या बखरीत एक नोंद असलेली दिसून येते. ‘शिवाजीने बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्याच्या मगदूराप्रमाणे नोकऱ्या दिल्या.’ त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळाला.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात अस्पृश्य, इतर मागास, भटक्या जातीजमातीचे लोक जसे होते तसेच त्यांच्या आरमारात सर्व वर्गातील लोक होते. शिवाजी राजांच्या आरमाराचे प्रमुख दर्यावदी असलेले इब्राहीमखान हे मुस्लीम व कोकणातील भंडारी जातींचे होते. तसेच सैन्यामध्ये कोळी, सोनकोळी या जातींच्या लोकांचा समावेश अधिक प्रमाणात होता. मायनाक भंडारी हे नाविक अंमलदार होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात निष्ठावंत असलेल्या मुस्लीम सरदारांचे योगदान उल्लेखनीय ठरते. ईब्राहीमखान हा तोफखान्याचा प्रमुख होता. तर कोकण किनारपट्टीवर आरमारी जबाबदारी दर्यासारंग दौलतखानावर होती. मदारी मेहतर हा सुध्दा मुस्लीम असून शिवाजी महाराजांचा तो खास नोकर होता व आग्रा सुटकेच्या प्रसंगात मदारी मेहतरची कामगिरी आपण जाणतोच. या बरोबरच सिद्दी हिलाल त्याचा पूत्र वाहवाह हिलाल, काझी हैदर आणि शामा खान यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. तसेच सभासद बखरीत आणि राजवाडयांच्या ‘मराठयांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाच्या खंड १७ मधील पान क्रमांक १७ वर नूरबान बेग याचा उल्लेख ‘शिवाजीचा सरनौबत’ असा उल्लेख आहे. (मोरे २०१२)
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत अठरापगड जातीपैकी न्हावी समाजांच्या दोन शूरांचा इतिहास कदापी विसरता येणार नाही. त्यातील पहिले वीर म्हणजे जीवा महाला. जीवा महाला यांचा उल्लेख प्रबोधकार ठाकरे यांनी ‘जीवा महाल्ल्ये’ असा केलेला आहे. (ठाकरे २००३ ) त्याचे मूळ नाव जीवा सकपाळ असे असून जावळी प्रांतातील कोंडवली हे त्याचे गाव होते. जीवा महालाने मोठया शिताफीने शिवरायांचे प्राण वाचविले म्हणूनच ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हणच रुढ झाली. दुसरा प्रसंग पन्हाळगडच्या वेढयाचा असून कडेकोट वेढयातून महाराजांना सोडविण्यासाठी जो बेत आखला त्यात खोटे शिवाजी महाराज होऊन पालखीत शिवा न्हावी बसलेला वीर होता. आपण पकडलो जाणार व आपला खातमा होणार हे माहीत असूनही मरणाला न भिता शत्रूच्या तलवारीचे वार झेलून स्वराज्यासाठी बलिदान देणारा शिवा न्हावी म्हणजे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराज जगले पाहजेत ही उदात भावना होती आणि अशी भावना निर्माण करण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले होते.
नंतरच्या काळात पन्हाळगडाच्या वेढयातून विशाळगडावर शिवाजी महाराज पोहचण्यापूर्वी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड आपल्या रक्ताने ‘पावन’ केली. त्यांच्यासह अनेक मावळे कापले त्यांची नावेसुध्दा इतिहासाला माहीत नाहीत. अशीच घटना २४ फेब्रुवारी १६७४ रोजी घडली होती. आदिलशहाचा सरदार बहलोलखानांशी दोन हात करता करता नेसरी जिल्हा कोल्हापूर येथे सात वीरांना वीरमरण आले. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे ज्यांचे वर्णन केले जाते ते सात अठरापगड जातीचे मराठी मावळे म्हणजे प्रतापराव गूर्जर, विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दिपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल आणि नेसरी गडहिंग्लज येथील मराठी शिपाई असलेले कृष्णा भासकर हे होते. (सरदेसाई १९८८)
याशिवाय शिवाजी राजांच्या स्वराज्याचे खऱ्या अर्थाने कान व डोळे असलेले बर्हिजी नाईक हे दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व असून सूरत लूट तसेच शिवाजी महाराजांच्या अनेक महत्त्वाच्या लढयापूर्वी हेरगिरी करणारे बर्हिजी हे गावाकुसाबाहेरचे रामोशी समाजाचे होते. बर्हिजी नाईक यांचे मूळ आडनाव जाधव असून ग्रॅट डफ यांच्या मते ते मांगरामोशी समाजातील असावेत असा उल्लेख सभासदाच्या बखरीत आलेला आहे. (पानसरे १९९१)
सर्वश्रृतच आहे की, छत्रपती शिवरायांच्या काळात समाज व्यवस्थेत जातिप्रथा ताठर स्वरुपाची होती; मात्र शिवाजी महाराजांनी जातिभेदाला थारा न देता आपल्या स्वराज्यातील मांग, महार, बेरड, रामोशी अशा अनेक वंचित जाती समुदायातील कर्तबगार लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कामे दिली होती.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेस प्रारंभीच्या काळात अनमोल शौर्याने गाजलेले व्यक्तिमत्व बाजी पासलकर हे मावळ प्रांतातील मराठा देशमुख होते. अशा पराक्रमी सरसेनापतीसोबत सावली सारखे राहून स्वराज्याचे रक्षण करणारा व्यक्ती म्हणजे वंचित अशा मांग समाजातील ‘येलजी मांग’ ही होती. याची साक्ष शिवकालीन शाहीर यमाजींच्या पोवाडयातून दिसून येते. तसेच वयाच्या सोळाव्या वर्षी बालशिवजीने स्वराज्याची शपथ घेतलयानंतर स्वराज्याचे तोरण बनविणारे व बांधणारे येलजी मांग व थोरले लहुजी मांग होते. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात पुरंदर गडावर झालेल्या लढाईत येलजी मांग यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. आजही सासवडमधील गांधी चौकात येलजींची समाधी दिसून येते. येलजीबरोबरच मुघलांच्या तोफा निकामी करणारे सर्जेराव मांग, रामसेज किल्ल्याचे किल्लेदार वीर बाबाजी मांग (नाईक) आणि शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईत व कर्नाटकाच्या स्वारीत पालखी वाहून नेणाऱ्यात भोई, महार व मांग लोकांचा मोठया प्रमाणात समावेश होता. कॉ. गोविंद पानसरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळण्याचे काम प्रामाणिकपणे महार समाजातील लोकांनी केले. काही किल्ल्यांचे किल्लेदार महार होते. तसेच शिवकाळात निरोपाच्या देवाणघेवाणीचे मोठे काम महार करीत असत.
अशा पध्दतीने महार, मांग, रामोशी, मेहत्तर, न्हावी, भंडारी, कुणबी, मराठा, ब्राह्मण, शेणवी, प्रभु, धनगर अशा अठरापगड जातिजमातींच्या समुदायाला हक्काचा जाणता राजा वाटणारे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व असल्याने महात्मा फुले यांनी शिवाजी राजांना ‘कुळवाडी भूषण’ म्हटले असावे. छत्रपती शिवाजी राजांनी अठरापगड जातींना न्याय दिला. या संदर्भात प्रा.दिनेश मोरे म्हणतात, “पारंपारिक व्यवस्थेने छळलेल्या आणि तळागाळातील घटकाला न्याय देण्याचे क्रांतीकार्य शिवरायांनी आपल्या काळानुरुप केले. म्हणूनच ३५० वर्षांनंतरही मराठी माणसाला शि-वा-जी या तीन शब्दांचे प्रचंड आकर्षण आहे.
शिवजयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा!