मुंबई –:आता देशात हवाई प्रवास महाग झाला आहे. दिल्ली मुंबई दरम्यान २५०० रुपयांना मिळणारे एअर इंडियाचे तिकीट आता ४००० रुपयांना मिळत आहे. इंडिगोने प्रवास करण्यासाठी हेच तिकीट ६००० रुपये आहे. तिकीट दरवाढीची दोन कारणे दिली जात आहेत. पहिले कारण म्हणजे एटीएफ २६ टक्क्यांनी महाग झाला आहे. दुसरे कारण म्हणजे ८० ते ९०% जागांची विक्री २०२२ च्या सुरुवातीपासून एव्हिएशन टर्बाइन इंधन दर १५ दिवसांनी वाढत आहे. आता पाचव्यांदा ३.३० टक्के वाढ केल्यानंतर, यावर्षी एटीएफ २६ टक्क्यांनी वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट संपल्यानंतर आता प्रवाशांकडून अतिउत्साह दाखवला जात आहे. त्यामुळे अशा स्थितीत विमान कंपनी भाड्याची डायनॅमिक पद्धत वापरत आहे. म्हणजेच, विमानातील सीट्स अधिक वेगाने विकल्या जात आहेत. त्यामुळेच ही भाडेवाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती हा भाडेवाढीचा एक छोटासा घटक आहे आणि सीट्स लवकर भरणे हा त्याहून मोठा घटक आहे. विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की, आम्ही किंमत वाढवली आणि विमान रिकामे झाले, तर त्याचा काही उपयोग नाही, त्यामुळे प्रवाशांचा उत्साह लक्षात घेऊन किंमत ठरवली जाते. अर्थात विमान प्रवासाची तिकिटे एक वर्ष अगोदर खरेदी करता येतात, परंतु विमान प्रवासाच्या एक महिना आधी किमान ३०% तिकिटे विकली जावीत असे एअरलाईन्स पाहतात. तसे न झाल्यास तिकिटांचे दर कमी केले जातात किंवा काही ऑफर देऊन तिकीटांची विक्री केली जाते. पण प्रवासाच्या एक महिना आधी तीस टक्क्यांपर्यंत तिकीट विक्री झाली असेल आणि ८० टक्क्यांपर्यंत सीट्स भरणे अपेक्षित असेल, तर तिकीटाचे दर वाढवले जातात. याला डायनॅमिक भाडे प्रणाली म्हणतात, ज्यामध्ये प्रत्येक दहा टक्के तिकीट विक्रीसह, पुढील दहा टक्के तिकिटांची किंमत वाढते.