पुणे – राज्यात आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. आज इंग्रजीचा पहिला पेपर झाला असून त्यांना वाढीव वेळ देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात परीक्षा ऑफलाईन झाल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला. तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. आजपासून सुरू झालेली परीक्षा बारावी बोर्डाची 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील.
कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. पहिले सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत होते. तर दुसऱ्या सत्रात पेपर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत होते. एका हॉलमध्ये केवळ २५ विद्यार्थांना परेक्षेसाठी बसवण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली होती. परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे. परीक्षेला राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 9 हजार 635 ठिकाणी होणार आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे बोर्डाच्या प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकल्या नाहीत. सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे नियमावलीसह दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात आले. ग्रामीण भागात एसटी बस अजूनही सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थांना अडचणीला सामना करावा लागला. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या आगोदर किमान 30 मिनिटे जावं लागेल. विद्यार्थ्यांना मास्कसोबत ठेवणे अनिवार्य आहे, त्याचसोबत त्यांच्याकडे सॅनिटायझर ठेवणे गरजेचं आहे.परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांची तापमान तपासणी केली जाईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाही.