संत रविदास जयंतीनिमित्त मदन पवार यांचा सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे गौरव; ​भारतीय संविधानिक मूल्यांचा जागतिक स्तरावर जागर; ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद’ पुस्तकाचे सिडनीत स्वागत

संत रविदास जयंतीनिमित्त मदन पवार यांचा सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे गौरव; ​भारतीय संविधानिक मूल्यांचा जागतिक स्तरावर जागर; ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद’ पुस्तकाचे सिडनीत स्वागत

संत रविदास जयंतीनिमित्त मदन पवार यांचा सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे गौरव

कोल्हापूर | दि. ९ (प्रतिनिधी):

समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे क्रांतीकारी संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ‘श्री गुरु रविदास सभा, सिडनी’ यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात कोल्हापूरचे ज्येष्ठ विचारवंत, सेवानिवृत्त कस्टम अधिकारी आणि पौर्णिमा फाउंडेशनचे मानद सचिव मदन पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

वैचारिक क्रांतीचा जागतिक उद्घोष

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद कुमार होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान आणि संविधान जागृती अभियानातील सक्रियतेबद्दल मदन पवार यांना संस्थेचा लोगो असलेली मानाची शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष बलजींदर रतन यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा केवळ जयंती उत्सवापुरता मर्यादित न राहता, भारतीय संविधानिक मूल्यांचा जागतिक स्तरावर झालेला जाहीर उद्घोष ठरला.

संत रविदास महाराजांचे कार्य तलवारीपेक्षा धारदार : मदन पवार

सत्काराला उत्तर देताना मदन पवार यांनी संत रविदास महाराजांचे कार्य ‘राष्ट्रसंत, जगद्गुरु, क्रांतिकारी विचारवंत आणि थोर समाजसुधारक’ अशा चार सूत्रांत मांडले. ते म्हणाले, “तथागत गौतम बुद्धांपासून सुरू झालेली मानवतावादी परंपरा संत रविदास महाराजांच्या कार्यातून पुढे गेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिला संविधानाच्या रूपाने मूर्त रूप दिले. सामाजिक विषमतेच्या अंधकारात महाराजांची वाणी तलवारीपेक्षा अधिक धारदार होती.”

पुस्तकाला सिडनीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मदन पवार यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद’ हे पुस्तक या कार्यक्रमात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील मराठी बांधवांनी या पुस्तकाचे स्वागत करत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान पुस्तकाची मोठी विक्री व आगाऊ नोंदणी (बुकिंग) झाली.

दिग्गजांची उपस्थिती

या प्रसंगी संत रविदास महाराजांच्या जीवनकार्यावर पी.एचडी. केलेल्या डॉ. सीमा अत्री यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. ऑस्ट्रेलियातील ‘जस्टीस ऑफ द पीस’च्या माया राम कपिला यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, भक्तिमय वातावरणात संविधानिक मूल्यांची मांडणी करणे हे या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. कार्यक्रमास ऑस्ट्रेलियातील विविध राज्यांमधून आंबेडकरी विचारधारेतील अभ्यासक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *