’दैनिक सम्राट’चे संस्थापक बबन कांबळे यांना ठाण्यात अभिवादन; तृतीय स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन
ठाणे:
‘दैनिक सम्राट’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ विचारवंत का. बबन कांबळे साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ठाणे येथे अभिवादन सभा आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील समर्थ सेवक मंडळ सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून कांबळे साहेबांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश मा. अनिल वैद्य होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राज्य सचिव गौतमभाऊ सोनवणे उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती आणि श्रद्धांजली
कार्यक्रमात माजी न्यायाधीश यशवंत चावरे, माजी न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, चंद्रशेखर कांबळे, तसेच आयोजिका नीलिमाताई बबन कांबळे यांनी स्मृतिचिन्हास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, बबन कांबळे यांनी ‘सम्राट’च्या माध्यमातून उपेक्षितांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून दिले. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, ते पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल

.
यांची लाभली उपस्थिती
या सभेला दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे, कृपाल कांबळे, उल्हासनगर प्रतिनिधी रवींद्र धांडे, पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी, सांगली प्रतिनिधी शिवाजी कांबळे, कोल्हापूरचे रमेश रत्नाकर, रेडिओ स्टार कवी व गायक भगवान धेंडे, भारतीय बौद्ध महासभा ठाणे पर्यटन प्रमुख तुकाराम गायकवाड, सादिकभाई शेख, सिद्दिक पठाण, सो.ना. कांबळे, सुनील पवार, एस. बी. गायकवाड, नितीन सोनवणे, पुष्पा धाकतोडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साखरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला ठाणे आणि परिसरातील सम्राट प्रेमी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

