विकसित भारतासाठी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक – डॉ. रिता शेटीया
श्री शिव छत्रपती महाविद्यालयात ‘अर्थसंकल्प २०२६’ वर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न; पोस्टर व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जुन्नर : (प्रतिनिधी)
“देशाचा सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील योजनांची घोषणा केवळ कागदावर न राहता, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जागृती तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच समाजातील प्रत्येक घटकाला या योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ मिळेल,” असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका व ‘रिता इंडिया फाउंडेशन’च्या संचालिका प्रा. डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी केले.
येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प २०२६ : परिप्रेक्ष्य’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड
या कार्यशाळेचे औचित्य साधून महाविद्यालयात अर्थसंकल्पावर आधारित पोस्टर प्रदर्शन व नाविन्यपूर्ण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. सुनील पवार (राजगुरुनगर), डॉ. सचिन पवार (भोसरी) आणि डॉ. उमेश भोकसे (चाकण) यांनी काम पाहिले.
शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची गरज – डॉ. वाघमारे
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी कृषी क्षेत्राच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. “भारत हा आजही कृषिप्रधान देश असून लोकसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देशात ‘स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प’ मांडला जाणे काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या एचसी. डॉ. सवीता शेटीया, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. गोरक्षनाथ सानप, डॉ. प्रताप फलफले (संगमनेर), डॉ. श्रीकांत फुलसुंदर (नारायणगाव), डॉ. रमेश काशिदे (ओतूर), वाणिज्य विभाग प्रमुख सतीश जाधव, पर्यवेक्षक श्रीमंते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. रिता शेटीया यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पातील तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे नियोजन:
- प्रास्ताविक: अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन कसबे
- परिचय: प्रा. एम. आर. शेलार
- सूत्रसंचालन: प्रा. डॉ. एस. एच. काळे
- आभार: प्रा. आर. ए. मोरे
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अँड. संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पी. बी. सुकाळे, प्रा. जावेद शेख, मितेश गाडेकर व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

