कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात रंगेहात जेरबंद!
तक्रारदाराकडे अर्जाच्या चौकशीत मदत करण्यासाठी मागितली होती दीड लाखांची लाच; तडजोडीनंतर १ लाख स्वीकारताना कारवाई.
विशेष प्रतिनिधी | संघर्षनायक मीडिया:
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कोल्हापूरच्या पथकाने एका कारवाईत कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी तिघा जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रेस नोटनुसार, तक्रारदार (वय ५७ वर्षे, व्यवसाय – बेकरी दुकान) यांच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात एक अर्ज आला होता. या अर्जाची चौकशी कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष विश्वास साळुंखे (वय ४३ वर्षे) यांच्याकडे होती.
पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष साळुंखे यांनी तक्रारदार यांना अर्जाच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला १,५०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १,००,०००/- रुपये देण्याचे ठरले. या लाचेच्या मागणीमध्ये खासगी व्यक्ती फिरोज पापालाल विजापुरे (वय ४० वर्षे, रा. हेरवाड, ता. शिरोळ) आणि जमीर सलीम पठाण (वय ४१ वर्षे, रा. कुरुंदवाड) यांनी देखील मध्यस्थी करत लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कोल्हापूर कार्यालय येथे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB कोल्हापूरच्या पथकाने सापळा रचला.
दिनांक ०७/०८/२०२६ रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान, पंच साक्षीदारांसमोर आरोपी लोकसेवक संतोष विश्वास साळुंखे याने तक्रारदाराकडून १,००,०००/- रुपये लाच स्वीकारली. यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींची नावे:
१. संतोष विश्वास साळुंखे (वय ४३ वर्षे, पो.हे.कॉ., कुरुंदवाड पोलीस ठाणे, रा. शिवराज कॉर्नर, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
२. फिरोज पापालाल विजापुरे (वय ४० वर्षे, खाजगी इसम, रा. हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)
३. जमीर सलीम पठाण (वय ४१ वर्षे, खाजगी इसम, रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)
या तिन्ही आरोपींविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (भ्र.प्र.का.क. ७, ७अ, १२) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, तसेच सापळा पथकातील प्रकाश भंडारे (स.पो.फौ.), संदिप काशीद (पो.हे.कॉ.), सचिन पाटील (पो.हे.कॉ.), कृष्णा पाटील (पो.कॉ.), रविंद्र पाटील (पो.कॉ.) आणि गजानन कुराडे (चा.स.पो.फौ.) यांनी केली आहे.
या कारवाईचे पर्यवेक्षण वैष्णवी पाटील (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.कोल्हापूर) यांनी केले असून, श्री. शिरीश सरदेशपांडे (पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र) आणि श्री. अर्जुन भोसले (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
नागरिकांसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर कार्यालय (दूरध्वनी: ०२३१/२४४०९८९, व्हॉट्सअॅप: ९४०४३२१०६४, ९७६४१४०७७७) किंवा ई-मेल (dyspacbkolapur@gmail.com) वर संपर्क साधावा.
© २०२६ संघर्षनायक मीडिया वृत्तपत्र. सर्व हक्क सुरक्षित. | संपादक: संघर्षनायक टीम
