मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिपाइं आक्रमक; पोलीस प्रशासनाच्या नोटीसा झुगारून आंदोलनावर ठाम

मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिपाइं आक्रमक; पोलीस प्रशासनाच्या नोटीसा झुगारून आंदोलनावर ठाम

मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिपाइं आक्रमक; पोलीस प्रशासनाच्या नोटीसा झुगारून आंदोलनावर ठाम

कोल्हापूर (प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आक्रमक झाली आहे. मागासवर्गीय महामंडळांची कर्जमाफी आणि सीपीआर रुग्णालयातील कथित घोटाळ्यांच्या एसआयटी चौकशीसह विविध मागण्यांसाठी रिपाइंने आंदोलनाचा बडगा उगारला आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कारणाखाली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडून प्रा. शहाजी कांबळे व कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, मात्र प्रशासकीय दबाव झुगारून आंदोलनावर ठाम असल्याचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुख मागण्या:

  • मागासवर्गीय महामंडळांची संपूर्ण कर्जमाफी: शेतकऱ्यांच्या धर्तीवर आंबेडकरवादी व मागासवर्गीय वंचित, भूमिहीन लोकांनी उपजीविकेसाठी घेतलेली कर्जे माफ करावीत. यात महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत रोहिदास आणि अपंग आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जांचा समावेश आहे.
  • सीपीआरच्या नूतनीकरणाची एसआयटी चौकशी: सीपीआर रुग्णालयाच्या अडीचशे कोटींच्या नूतनीकरणातील कथित अनियमितता आणि ‘सर्जिकल घोटाळ्याची’ न्यायालयीन व एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी.
  • खोकेधारकांचे पुनर्वसन व वेठबिगारी बंद: गेल्या ४० वर्षांपासून सेवा देणाऱ्या मागासवर्गीय व अल्पसंख्याक खोकेधारकांची झालेली हकलपट्टी थांबवून त्यांचे तत्काळ पुनर्वसन करावे. तसेच, रोजंदारी कामगारांना ‘समान काम समान वेतन’ कायद्यानुसार मानधन मिळण्याची खात्री करावी.

​मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या संवेदनशील प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, पोलीस नोटीस मिळूनही बहुजन समाजाच्या हक्कासाठी आंदोलन निश्चित होईल, असा इशारा प्रा. शहाजी कांबळे यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *