सीपीआरमध्ये कार्यालय वाटपावरून वाद; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनवर वैद्यकीय अधीक्षकांचा ताबा!
कोल्हापूर (प्रतिनिधी): छत्रपती राजाराम महाराज (सीपीआर) रुग्णालयातील ऐतिहासिक हेरिटेज इमारतीच्या नूतनीकरणानंतर कार्यालय वाटपावरून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मुख्य केबिनचा ताबा वैद्यकीय अधीक्षकांनी घेतल्यामुळे या वादाची ठिणगी उफाळली असून, जिल्हा शल्यचिकित्सक नेमके कुठे बसणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकृत हेरिटेज इमारतीचे लोकार्पण नुकतेच रविवारी पार पडले. या नवीन प्रशासकीय रचनेमध्ये, ज्या केबिनमधून पूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा कारभार पाहत होते, त्या केबिनचा ताबा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने यांनी घेतला. त्यांनी रविवारीच संबंधित केबिनमध्ये प्रवेश करत आपल्या कामकाजाला सुरुवात केली आणि बाहेर ‘वैद्यकीय अधीक्षक’ अशी नवीन पाटीही लावली. या घडामोडीमुळे सीपीआर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
अधिष्ठातांसाठी स्वतंत्र व्यवस्था
या नव्या पुनर्रचनेदरम्यान इतर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचेही नियोजन करण्यात आले आहे. पूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक आणि समाजसेवा अधीक्षक यांचे कार्यालय एकत्र करून अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्यासाठी एक सुसज्ज व स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील इतर प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीही नवीन कार्यालयांची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, या अंतर्गत वादात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नवीन जागेचा प्रश्न पूर्णपणे अनिर्णित राहिला असून, या वादावर प्रशासन काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
