पावसाळा आणि घ्यावयाची काळजी
राज्यात येत्या शनिवारपर्यंत कोकणात तसेच घाटमाथ्यावर अतिमुसळधार, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, मराठवाड्यात हलका ते मध्यम, तर विदर्भात यलो अलर्टसह वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. यासाठी पाणी साचू न देणे, अस्वच्छता बाळगणे यासारख्या गोष्टी घातक ठरते. अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधा संभवते. त्यामुळे ताजे अन्न खावे, पाणी उकळून प्यावे. लहान मुले, वृद्धांची विशेष काळजी घ्यावी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय करावे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. पण काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. पावसाळा सुरू झाला की डासांची संख्या वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढतो. पाणी साचल्यामुळे डास आणखी वाढतात आणि माणसांसाठी ही गोष्ट त्रासदायक ठरते. पावसाळ्यात तापमानात चढ-उतार होतो. हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया वाढतात. परिणामी व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी-खोकला असे त्रास सुरु होतात.
पावसाळ्यात भिजल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे पावसात भिजणं टाळावं. जेणेकरून तुमचं आरोग्य बिघडणार नाही. आरोग्याशी निगडित कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना भेटावे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात आर्द्रता आणि अस्वच्छतेमुळे अन्न लवकर खराब होतं. त्यामुळे अन्नातून विषबाधा, अतिसार आणि टायफॉइडसारखे आजार होतात. या आजारांपासन बचावासाठी बाहेरचं फास्ट फूड खाणं टाळावे, घरचं ताजं अन्न खावे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पाणी फिल्टर करून किंवा उकळूनच प्यावे. पावसाळ्यात त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे आणि फंगल इन्फेक्शन असे त्रास होण्याची शक्यता असते.
अंडरआर्म्स, पाय, आणि कमरेच्या भागात घाम साचल्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढतं. फंगल इन्फेक्शन होऊ नये, यासाठी कॉटनचे कपडे घालणे, शरीर कोरडे ठेवणे, अँटी-फंगल पावडर किंवा क्रीमचा वापर करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब करावा. पावसाळ्यात अनेक लोकांना गुडघेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास जाणवतो. या ऋतूमध्ये सांधेदुखी आणि सूज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम करावे. गरम पाण्याचा शेक घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात.
मुलांना साचलेल्या पाण्यापासून दूर ठेवावी. बाहेर जाताना छत्री सोबत ठेवावी. तसेच भिजल्यास कपडे ताबडतोब बदलावी. वृद्धांनी गरम पाणी प्यावे. तसेच हलकं जेवण आणि वेळेवर औषधं घ्यावे. पावसाळ्यात आजारांपासून बचाव होण्यासाठी नियमित हात धुणे, संतुलित आहार घेणे आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद टाकलेलं दूध, तुळस आणि आल्याचा चहा प्यावा. फळांचं सेवन करावं. वेळेवर झोपणे, योगासने-प्राणायाम करणे, डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करणे, घराजवळ पाणी साचू न देणे आणि कुंड्यांमध्ये पाणी साठू न देणे, घर आणि घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. आजारांना आमंत्रण मिळू शकते. पालेभाज्या, मशरूम, फुलकोबी, ब्रोकोली, वांगी या भाज्या शक्यतो टाळाव्यात. आर्द्रता व पावसामुळे भाज्या लवकर दूषित होतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. पावसाळा सुरू झाला की आहाराची, तब्येतीची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण पावसाळ्यातच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. या ऋतूत चुकीच्या आहाराचे सेवन केल्याने किंवा सतत बाहेरचं खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
या ऋतूत आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात बाहेरचे उघडे अन्न खाणे टाळावी, कारण हा ऋतू माश्या आणि डासांच्या वाढीसाठी अनुकूल असतो. पण ब-याच जणांना हे माहित नसेल की पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या भाज्या पावसाळ्यात शक्यतो न खाण्याचा सल्ला दिला जातो. काही भाज्या पावसाळ्यात विषासारख्या आरोग्यावर परिणाम करतात. या ऋतूत भाज्यांचे सेवन देखील खूप काळजीपूर्वक करावे लागते. एका वृत्तानुसार पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि पाऊस हे बॅक्टेरिया आणि बुरशीसाठी अनुकूल वातावरण असते. या वातावरणात अन्न दूषित होते आणि रोगांचा धोका देखील वाढतो.
पावसाळ्यात लसूण आणि कांदा यासारख्या भाज्यांचे सेवन देखील कमी केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या खाऊ नये. पालक, कोबी सारख्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. पावसाळ्यात चिखल, कीटक आणि ओलावा यामुळे या भाज्या लवकर संक्रमित होतात. जर त्या व्यवस्थित स्वच्छ केल्या नाहीत तर त्याचे हानिकारक जंतू आपल्या पोटात जाऊ शकतात, ज्यामुळे आजारी पडण्याची किंवा पोट खराब होण्याची शक्यता असते. मशरूम हे पौष्टिक अन्न आहे, परंतु पावसाळ्यात त्याचे सेवन करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो, ज्यामुळे मशरूम खूप लवकर कुजण्यास सुरुवात होते. कुजलेल्या मशरूममुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात मशरूम खूप काळजीपूर्वक खावे किंवा खाणे सरळ टाळावे.
फुलकोबी आणि ब्रोकोली या क्रूसिफेरस कुटुंबातील भाज्या आहेत, ज्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. परंतु पावसाळ्यात त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. या भाजीची रचना अशी आहे की त्यात लहान खोबणी असते, ज्यामध्ये पावसाळ्यात ओलावा आणि कीटक सहजपणे अडकतात. या कीटकांना स्वच्छ करणे कठीण होते, कारण फक्त धुवून त्या पूर्णपणे स्वच्छ करता येत नाहीत. जर या भाज्या योग्यरित्या शिजवल्या नाहीत तर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो, विशेषतः ज्यांची पचनसंस्था संवेदनशील असते. तसेच वांगी ही सहसा एक चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध भाजी असते. परंतु पावसाळ्यात ती खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पावसाळ्यात ओलावा आणि मातीमुळे वांग्यांमध्ये लवकर किड लागते, ज्यामुळे विषबाधा किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९