प्रतिनिधी शितल कांबळे, चोकाक
हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद (जि. प.) आणि पंचायत समिती (पं. स.) निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सर्वसामान्यपणे छोटंसं गाव म्हणून ओळख असलेल्या चोकाकसारख्या ठिकाणीही निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाची घोषणा होताच इच्छुकांनी त्वरित गाठीभेटी सुरू केल्या असून, लढण्याच्या तयारीला लागले आहेत.
‘आता लढायचं अन जिंकायचं’चा इरादा
इच्छुकांनी आणि त्यांच्या उत्साही समर्थकांनी ‘आता थाम्बायचं नाही लढायचं अन जिंकायचं’, ‘आता माघार नाहीच मैदान मारणार’ आणि ‘सदैव सोबत जनतेच्या’ असे इरादे स्पष्ट करणारे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘पक्ष कोणता यापेक्षा लढणार फिक्स’ असा संदेश देत, इच्छुकांनी निवडणुकीत उतरण्याचा आपला निर्धार ठाम केला आहे. त्यामुळे या निवडणुकीला मोठी रंगत येण्याची चिन्हे आहेत.
नेत्यांचे बारकाईने लक्ष
हातकणंगले आणि करवीर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक जिल्हा परिषद गट असल्याने या तालुक्यांवर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे बारीक लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीनंतर होणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांना संधी देणारी तसेच नेत्यांची तिकीट वाटप करताना कसोटी पाहणारी ठरणार आहे.
महायुतीमुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ
मागील निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजप आणि जनसुराज्य पक्षाचे वर्चस्व होते. आता राज्यात महायुती सत्तेवर असल्याने इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील राजकीय चित्र पाहता:
- जनसुराज्य पक्षाकडे: घुणकी, भादोले, कुंभोज हे मतदारसंघ.
- भारतीय जनता पक्षाकडे (भाजप): आळते, शिरोली, कोरोची, कबनूर, रुई हे मतदारसंघ.
- शिंदे सेनेचे (शिवसेना): रुकडी, पट्टणकोडोली, रेंदाळ या ठिकाणी उमेदवार असण्याची शक्यता आहे.
एकूणच, आरक्षणाच्या घोषणेनंतर हातकणंगले तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले असून, इच्छुकांच्या जोरदार तयारीमुळे आणि महायुतीच्या समीकरणामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.