संविधानाचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करा; पँथर आर्मीचा एल्गार!
नाशिकमधील घटनेचा राज्यभर तीव्र निषेध; ‘त्या’ वन कर्मचारी महिला भगिनीच्या पाठीशी पँथर आर्मी खंबीर
मुंबई/नाशिक:
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी नाशिकमध्ये आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे जाणीवपूर्वक टाळले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, या संविधानविरोधी वृत्तीचा ‘पँथर आर्मी’च्या वतीने कडक शब्दांत निषेध करण्यात येत असल्याचे पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
काय आहे नेमकी घटना?
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरकारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी महापुरुषांच्या नावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही. या प्रकारावर तेथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या एका संविधानप्रेमी महिला कर्मचाऱ्याने अत्यंत निधड्या छातीने मंत्र्यांना थेट जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे.
पँथर आर्मीची भूमिका:
“प्रजासत्ताक दिन हा संविधानामुळेच साजरा केला जातो आणि त्याच कार्यक्रमात संविधानाच्या शिल्पकाराचा विसर पडणे हा केवळ निष्काळजीपणा नसून दलित समाज आणि लोकशाही मूल्यांचा जाहीर अपमान आहे,” असे संतोष आठवले यांनी म्हटले आहे. जाब विचारणाऱ्या त्या महिला कर्मचाऱ्याचे कौतुक करताना त्यांनी तिला ‘भीम वाघीण’ अशी उपमा दिली असून, पँथर आर्मी पूर्ण ताकदीनिशी तिच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप सरकारला शेवटचा इशारा:
पँथर आर्मीने आपल्या मागण्या मांडताना सरकारला इशारा दिला आहे की, जर संबंधित महिला कर्मचाऱ्यावर कोणतीही दंडात्मक किंवा निलंबनाची कारवाई झाली, तर पँथर आर्मी मंत्रालयाला घेराव घालेल.
प्रमुख मागण्या:
- मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी मंत्र्यांवर ‘ॲट्रॉसिटी ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
- महिला कर्मचाऱ्याला कोणताही त्रास होणार नाही, याची लेखी हमी सरकारने द्यावी.
”संविधानाचा अपमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. बाबासाहेबांचा अपमान पँथर आर्मी कदापि सहन करणार नाही आणि यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू,” असा इशारा संतोष आठवले यांनी दिला आहे.
