‘रॉकेट’ ब्रँडचे महाभयंकर रॅकेट उद्ध्वस्त; कागल एक्साईजचा तस्करीवर सर्जिकल स्ट्राईक!
६१ लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्याच्या दारूला महाराष्ट्राचे बनावट लेबल लावून नागपूर-चंद्रपूरला देणार होते ‘धोका’.

कोल्हापूर (प्रतिनिधी, अमोल कुरणे):
निवडणुकीच्या रणधुमाळीत मद्याचा पूर वाहण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांच्या मनसुब्यांवर कागल राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाणी फेरले आहे. गोव्यात तयार झालेली दारू चक्क महाराष्ट्रातील ‘रॉकेट’ ब्रँडच्या नावाखाली खपवणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, तब्बल ६१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

’बस्तवडे फाटा’ येथे थरारक सापळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात कडक पाळत ठेवण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिले होते. यानुसार, देवगड-निपाणी मार्गावरील बस्तवडे फाटा येथे एक्साईजच्या पथकाने सापळा रचला. संशयास्पद वाटणारा टाटा आयशर ट्रक (क्रमांक MH-40-CM-2635) अडवून तपासणी केली असता, यंत्रणेचेही डोळे विस्फारले.

पाण्याचे बॉक्स आणि आत ‘विषारी’ गुपित!
वरकरणी पाहता ट्रकमध्ये पिण्याच्या पाण्याचे ५०० बॉक्स भरलेले दिसत होते. मात्र, पोलिसांनी सखोल झडती घेतली असता, पाण्याच्या बॉक्सच्या आडोशाने लपवलेले देशी दारूचे तब्बल १,००० बॉक्स आढळले. यामध्ये ९० मि.ली. च्या एकूण १ लाख बाटल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, या बाटल्यांवर अहमदनगरमधील ‘प्रवरा डिस्टलरी’च्या ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ या ब्रँडचे बनावट लेबल लावण्यात आले होते.

मुद्देमाल आणि अटक
- जप्त दारू: १ लाख बाटल्या (किंमत ४० लाख रुपये).
- वाहन व इतर: आयशर ट्रक, पाण्याचे ५०० बॉक्स आणि मोबाईल (एकूण किंमत ६१.१५ लाख).
- अटक आरोपी: चालक सलिम खय्युम शेख (३५, तेलंगणा) आणि सुरज तेजराव सावंग (२८, यवतमाळ).
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची एक्साईज कोठडी सुनावण्यात आली आहे.

“गोव्याच्या बनावट मद्यामुळे शासनाचा ४० लाखांचा महसूल बुडाला असता. तस्करीची ही साखळी तोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— तपास पथक, राज्य उत्पादन शुल्क.

महसूल उद्दिष्टाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न?
चालू आर्थिक वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ हजार कोटींचे महसूल उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, अशा प्रकारे गोव्यातून बेकायदेशीर दारू महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र बनावटी’चे लेबल लावून आली, तर शासनाचा कोट्यवधींचा कर बुडणार आहे. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात ही दारू विक्रीसाठी जाणार होती.
ही कारवाई कोणी केली?
आयुक्त डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे, उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर, सब-इन्स्पेक्टर अजितकुमार नायकुडे, कॉन्स्टेबल सचिन काळेल आणि टीमने ही कामगिरी फत्ते केली.

