मुरगुड नगरपरिषदेचा नगर अभियंता ४० हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात; कोल्हापूर एसीबीची मोठी कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):
हुपरी नगरपरिषदेचे तत्कालीन नगर अभियंता आणि सध्या मुरगुड नगरपालिकेत कार्यरत असलेले वर्ग-२ चे अधिकारी प्रदीप पांडुरंग देसाई (वय ४७) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. एम.बी. (Measurement Book) रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या बदल्यात त्यांनी ही लाचेची मागणी केली होती.
नेमकी घटना काय?
यातील ४७ वर्षीय तक्रारदार हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांनी हुपरी नगरपरिषद अंतर्गत काही विकासकामे पूर्ण केली होती. या कामांचे एम.बी. रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी तत्कालीन नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये देसाई यांनी यापूर्वीच स्वीकारले होते.
बाकी रकमेसाठी तक्रारदाराने कोल्हापूर एसीबीकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. १९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, देसाई यांनी तडजोडीअंती एकूण १ लाख ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये सोमवारी (१९ जानेवारी) स्वीकारण्याचे ठरले.
एसीबीचा सापळा आणि अटक
मिळालेल्या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना प्रदीप देसाई यांना रंगेहात पकडण्यात आले.
घरझडती आणि पुढील कारवाई
एसीबीने आरोपीचा मोबाईल आणि वाहन जप्त केले असून, त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानाची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. घराच्या झडतीमध्ये काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपीविरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील आणि चालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर करत आहेत.
महत्वाची टीप: कोणत्याही शासकीय लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

