‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ला पँथर आर्मीचा बिनशर्त पाठिंबा
; आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या नेतृत्वावर टाकला विश्वास
जयसिंगपूर: प्रतिनिधी
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना’ या संघटनेने आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ला आपला “बिनशर्त जाहीर पाठिंबा” घोषित केला आहे. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आघाडीचे पारडे जड झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


सोमवारी पँथर आर्मीच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपुर्द केले.
विकासाच्या मुद्द्यावर एकत्र
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी डॉ. राजेंद्र पाटील हे ‘विकासपुरुष’ म्हणून सातत्याने कार्य करत आहेत. तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारणे, आरोग्य व्यवस्था बळकट करणे, दर्जेदार रस्ते, सांडपाणी निचरा आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हा विकासाचा रथ केवळ त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे जाऊ शकतो, असा ठाम विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती उमेदवारांना बळ
संस्थेचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांच्या आदेशानुसार, शिरोळ तालुक्यातील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व ७ जिल्हा परिषद उमेदवार आणि १४ पंचायत समिती उमेदवारांच्या विजयासाठी पँथर आर्मीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.
यावेळी पँथर आर्मीचे जिल्हा महासचिव नितेश कुमार दिक्षांत, शिरोळ तालुका अध्यक्ष भिक्कू कांबळे, उपाध्यक्ष भैय्यासाहेब धनवडे, महासचिव संतोष खरात हातकणंगले तालुका अध्यक्ष राजू मोमीन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
”शिरोळच्या विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते गावागावात जाऊन काम करतील.”
— नितेश कुमार दिक्षांत जिल्हा महासचिव पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना
