आरोग्यमंत्र्यांचे सकारात्मक निर्देश; आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘ईएसआयएस’ लागू होणार!संघटनेकडून निर्णयाचे स्वागत; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

आरोग्यमंत्र्यांचे सकारात्मक निर्देश; आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘ईएसआयएस’ लागू होणार!संघटनेकडून निर्णयाचे स्वागत; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

आरोग्यमंत्र्यांचे सकारात्मक निर्देश; आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘ईएसआयएस’ लागू होणार!

संघटनेकडून निर्णयाचे स्वागत; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

मुंबई, २६ जून (प्रतिनिधी) :

महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक तसेच मासिक २१ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या कंत्राटी (एनएचएम) कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. सरकारच्या या सकारात्मक निर्णयाचे ‘महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटने’च्या वतीने जाहीर स्वागत करण्यात आले असून, आरोग्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

​मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या समिती कक्षात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसह पतसंस्था, रेशन दुकाने, खाजगी शाळा, स्वयंरोजगार संस्था आणि सार्वजनिक वाचनालयातील अल्प उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचा (ESIS) लाभ देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

​राज्यात सध्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १०८/१०२ आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील कंत्राटी कर्मचारीही आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. मात्र, कंत्राटी स्वरूपामुळे आजवर त्यांना सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य संरक्षणाचे लाभ मिळत नव्हते.

‘ईएसआयएस’ (ESIS) योजनेचे फायदे:

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार, अपघात विमा, गंभीर आजारांवरील सहाय्य, मातृत्व लाभ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी संपूर्ण आरोग्य संरक्षण उपलब्ध होणार आहे.

केवळ घोषणा नको, प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज!

​आरोग्यमंत्र्यांच्या या निर्देशांचे स्वागत करतानाच, संघटनेने केवळ घोषणांवर समाधान न मानण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही आशा स्वयंसेविकांना मोबाईल किंवा लॅपटॉप देण्याबाबत अनेकदा घोषणा झाल्या, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

​त्यामुळे कोणत्याही घोषणेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांनी संयम राखावा आणि केवळ श्रेय घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

लढाई अद्याप संपलेली नाही: कॉ. सुमन पुजारी

​या संदर्भात माहिती देताना महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन शंकर पुजारी यांनी सांगितले की,

“आरोग्यमंत्र्यांचे निर्देश हे आपल्या संघर्षाचे पहिले यश आहे. मात्र, केवळ घोषणा आणि निर्देश पुरेसे नसून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी संघटित राहून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ईएसआयएस योजनेचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळेपर्यंत संघटना आपला संघर्ष आणि पाठपुरावा सुरूच ठेवेल.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *