विद्यार्थी प्रेमळ आधाराचा भुकेला..!
परीक्षा काळात प्रेमाची फुंकर, मायेची ऊब आणि आपुलकीची थाप अपेक्षीत
देव जसा भक्तीचा भुकेला असतो तसा आपल्यातील प्रत्येक विद्यार्थी हा प्रेमाचा भुकेला असतो. पण जनरली होतं काय? तर परीक्षा जवळ आली की, शाळा, घरचे आणि बाहेरचे अभ्यासाची तंबी देताना दिसून येतात. ते सतत रागावत असतात, तक्रारी करतात, नाहीतर सूचना देतात. यासारख्या दडपणामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे खरंतर अशावेळी प्रेमाची, आपुलकीची अत्यंत गरज असते.
आता सर्वत्र लहान-मोठ्या सा-यांच्याच परीक्षांचे गारवे वाहू लागले आहे. हे गारवे कुणाच्या अंतर्मनाला आनंदाने मिठी मारतात. तर कुणाच्या सर्वांगाला भितीने स्पर्शून थरकाप उडवितात. ज्यांचा अभ्यास झालेला असतो, त्यांच अंतर्मन सुखावलेलं असतं. तर ज्यांचा अभ्यासच झालेला नसतो, त्यांचा थरकाप उडालेला असतो. त्याचं एक मजेशीर कारण आहे. अगदी परीक्षेच्या आधीच्या काळापर्यंत विद्यार्थी हा अभ्यासाला पुढच्या दिवसांवर ढकलत असतो. असे करता करता नेमक्या परीक्षा काळात मात्र तो चिंताग्रस्त होतो. याच एकमेव कारण म्हणजे त्याने अभ्यासाच्या बाबतीत वेळेचं न केलेलं नियोजन...काही विद्यार्थी हे उन्हाळाच्या सुट्टीतच वेळेचं नियोजन करतात; परंतु काही विद्यार्थी हे आत्ताच कसली घाई आहे ? शाळा सुरू झाल्यानंतरही करता येते, असे म्हणून पुढे ढकलत असतात आणि शाळा सुरू झाल्यावर मग आत्ताच थोडी ना परीक्षा आहे. करताच येते मग, या विचाराने परीक्षा दोनतीन महिन्यावर असते तेव्हा याची धांदल उडते. तेव्हा कुठे हा नियोजन करत असतो; पण त्याचं हे आत्ताचं नियोजन काहीच कामी येत नसतं.
बरेच विद्यार्थी हे पूर्णत: काॅपीवर अवलंबून असतात. त्यांना असं वाटतं की आपण काॅपी करण्यात एक्सपर्ट आहे. पर्यवेक्षकांना आपल्यावर कोणत्याच प्रकारची शंका येणार नाही. पण तो ही गोष्ट विसरतो की, त्याच्या हाताखाली काही मोजकेच पर्यवेक्षक येणार आहेत; परंतु याउलट रिस्थितीचा विचार केल्यास त्यांच्या छत्रछायेखालून याच्यासारखे कितीतरी परीक्षार्थी गेलेले असतात. त्यामुळे ते याला अचूक हेरतात. खरंतर यांना काॅपीचं सूत्रच माहित नाही. काॅपी केव्हा करायची असते ? जेव्हा तुमचा अभ्यासक्रम सत्तर ते ऐंशी टक्के झालेला असतो आणि वीस ते तीस टक्के बिलकुलच झालेला नसतो. तेव्हा केवळ त्या उर्वरित टक्क्यांवर नाइलाजास्तव काॅपी करण्यास काही हरकत नाही. परंतु पूर्णत: काॅपीवर अवलंबून राहू नये. ज्याप्रमाणे विद्यार्थी काॅपी करण्यावर डोकं चालवत असतो, त्याचप्रमाणे त्याने जर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यावर डोकं चालविलं तर काॅपी करण्याचा प्रश्नच उरत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काॅपी तर चालत नाही, चालली तरी केवळ शालेय परीक्षांतच...इतर स्पर्धा परीक्षात तर त्याचा विचारच करता येत नाही. मात्र सेटिंगचा भाग हा वेगळा... येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. मी काॅपीचं कुठल्याच प्रकारे समर्थन करत नाही आहे. तर केवळ एक शक्यता दर्शवीत आहे. मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हाला...
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुणाईला क्रिकेटच्या वेडानं ग्रासलेलं आहे. नेमक्या परीक्षा काळातच या क्रिकेटचे वारे वाहू लागतात. परंतु मागिल दोन वर्षापासून व्हायरस नावाच्या अनेक नवनविन जीव उत्पत्ती व त्यांच्या मुक्त संचारामुळे या वा-यात खंड पडत आहे. नाहीतर आयपीएलचे वारे वाहण्यास कधीचीच सुरुवात झाली असती. परंतु हे खंडीकरण एका दृष्टीने आनंदाची बाब आहे. समजा परीक्षा काळात हे वारे वाहत असतील तर परीक्षार्थ्याने आपलं मन विचलित होऊ न देता अल्प काळासाठी या वा-यांकडे दुर्लक्ष करावं, म्हणजे तुमचा भविष्यकालीन मार्ग सुकर व सोपस्कार होईल. याच काळात ब-याच ठिकाणी मेला लागलेला असतो. ही गोष्ट तुमच्यासाठी काही नवल नाही. असे कितीतरी मेले तुम्ही बघितले आहेत, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिवाय वेगवेगळे फंक्शन याकडे पण कानाडोळा करावं लागेल. मागिल वर्षी ब-याच विद्यार्थ्यांना कोरोना या महामुनीचा कृपाप्रसाद लाभला होता. परंतु या वर्षी मात्र त्याचा धाकटा भाऊ ओमायक्राॅनचा आशीर्वाद लाभण्याची पुसटतशी शक्यता मनात येत असली तरी त्याची काहीच हमी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पुसटशा अदृष्य शक्तीच्या मायाजाळ्यात अडकून बळी न पडता आपल्या भक्कम अशा अभ्यासरुपी शस्त्रास्त्राने या परीक्षारूपी युद्धाला तयार रहावे.
खरंतर आपली शिक्षणपद्धतीच पूर्णत: चुकीची आहे. ज्या गोष्टीत आपल्याला रस नाही, त्या गोष्टी बंधनकारक करून त्याचं ओझं आपल्यावर लादल्या जातं. शिक्षण हे कसं असावं ? तर ते व्यावहारिक असावं म्हणजे जेणेकरून त्या शिक्षणाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो. आता मला सांगा, आपण दुकानात जाल, बँकेत जाल तर तेथे लाॅगॅरिदम किंवा साईन-काॅसचा आपल्याला या व्यवहारात काय उपयोग होतो. तसेच चीन किंवा इतर देशाच्या इतिहासाची किंवा तेथील भौगोलिक स्थितीची आपल्याला काय गरज..? आपल्याला भारताचाच इतिहास नि भौगोलिक परिस्थिती पूर्णत: स्मरणात ठेवण्यास अवघड जातो. मग तो फक्त एका वर्षासाठीच का म्हणून वापरायचा ? त्याचा आपल्याला व्यावहारिक जीवनात सध्या आणि पुढे चालून काय फायदा आहे ? विचार करा! ही पूर्णत: चुकीची पद्धत नाही का ? चीन आणि जपानची शिक्षणपद्धती आपल्यापेक्षा ब-याच प्रमाणात विपरीत आहे. तेथील मुलांना ज्या गोष्टीत रस आहे, त्याच गोष्टीचं शिक्षण त्यांना दिलं जातं. म्हणून तर तेथील लहान मुलंसुद्धा टेक्नाॅलाॅजीत पुढे आहे आणि ते लहानपणापासूनच तांत्रिक वस्तूंची निर्मिती करतात. यातून आपल्या शिक्षणव्यवस्थेने काहीतरी धडा घेऊन आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करायला पाहिजे. तरच आपल्या देशाची बेकारी कमी होण्यास मदत होईल. नाहीतर दिवसागणिक ती वाढतच राहील, यात काहीच शंका नाही.
मुद्याची बाब घेता परीक्षार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करता शिक्षण मंडळ परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसविण्यासाठी दरवर्षी काही ना काही चेंजेस करत असतात. कधी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात बदल तर कधी इतर बाबी... यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. कारण या व इतर अनेक बाबींचा ब-याचशा शाळेत सविस्तर खुलासा झालेला नसतो. परंतु विद्यार्थ्यांनी या प्रकाराला न घाबरता आत्मविश्वासाने तोंड द्यावे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पालकांनीच महत्त्वाची भूमिका बजवायला हवी. कारण विद्यार्थ्यांच्या मनावर सर्वप्रथम परिस्थिती व पालकांचा विद्यार्थ्यांच्या बाबतीतील नकारात्मक दृष्टिकोन आणि कृती याचा वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांना होणारा आंतरिक त्राससुद्धा ते मनातल्या मनात कोंबत असतात. विद्यार्थ्यांना या दशेत प्रेमयुक्त धीरगंभीर आधार फक्त पालक, मित्र व शिक्षकाकडूनच मिळत असतो. पालक व शिक्षकांच्या प्रेमळ आधारामुळे उत्तम विद्यार्थ्यांपासून देशाचा उत्तम नागरिक होण्यापर्यंतची कला त्याला प्राप्त होते. सांगायचं तात्पर्य म्हणजे शेवटी सर्वकाही साध्य करण्याची चिकाटी त्याच्यात निर्माण होते. म्हणजे या सर्व गोष्टींमुळे तो एकूण परिस्थितीवर सहज मात करू शकतो.
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479