थोर समाजसेवक भाई माधवराव बागल

थोर समाजसेवक भाई माधवराव बागल

थोर समाजसेवक भाई माधवराव बागल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९०)

थोर समाज सेवक पद्मभूषण भाई माधवराव बागल यांचा ६ मार्च रोजी स्मृतिदिन आहे.२८ मे १८९५ रोजी जन्मलेले भाई माधवराव बागल ६ मार्च १९८६ रोजी वयाच्या एक्याणव्या वर्षी कालवश झाले.कोल्हापूरच्या इतिहासमध्ये विसाव्या शतकातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून भाई माधवराव बागल यांच्याकडे पाहावे लागते. कोल्हापूर आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. प्रजा परिषदेच्या लढ्यामध्ये ,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व करून भाई माधवराव बागल लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले होते. कालवश यशवंतराव मोहिते एकदा म्हणाले होते ,’ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनंतर नाव घेण्याजोगी कोल्हापुरातील व्यक्ती म्हणजे भाई माधवराव बागल ‘.

उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले बाई बागल कोल्हापुरात जन्मले. त्यांचे वडील’हंटरकार खंडेराव बागल कोल्हापुरातील पुरोगामी विचारांचे सुप्रसिद्ध वकील होते. सत्यशोधक चळवळीचे नेते होते. पुढे ते कोल्हापूर दरबारात अंमलदार म्हणून काम करू लागले. दरबारातील अंमलदारांच्या कुटुंबाला जी प्रतिष्ठा व सुस्थिती प्राप्त होते त्यामुळे माधवराव बागल यांचे बालपण ऐशो आरामात गेले. तसेच लहानपणापासूनच प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराजांशी त्यांचा जिव्हाळा निर्माण झाला. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर आपल्या अंगभूत चित्रकलेच्या प्रेमामुळे त्यांनी जे. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवले. खरे तर वडील खंडेराव यांना त्यांनी वकील व्हावे असे वाटत होते. पण मुलाचा कल त्यांनी माधवरावांना चित्रकलेचे शिक्षण घ्यायला परवानगी दिली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप मंजूर केली. आणि मुंबईत आपल्या बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये राहण्याची परवानगीही दिली. मुंबईत आठ वर्षे शिक्षण घेऊन माधवराव कोल्हापूरला परतले.भाई बागल उत्तम चित्रकार व शिल्पकार होते.

महात्मा गांधी कोल्हापूरला आले होते तेव्हा त्यांनी माधवरावांची चित्रे पाहिली.गांधीजी त्यांना म्हणाले, चित्रकार आहात तर अशी चित्रे काढा की ज्यामुळे जनसेवा घडेल. गांधीजींच्या या उद्गारांनी माधवराव विचारप्रवृत्त झाले. परिणामी त्यांच्यातील चित्रकारीचे वेड हळूहळू कमी होत जाऊन त्याची जागा समाजसेवकांना घेतली.हा एका अर्थाने त्यांच्या जीवनाला दिशा देणारा टर्निंग पॉइंट होता.आपल्या वडिलांच्या’ हंटर ‘ या वृत्तपत्रात माधवराव लेखन करू लागले. त्यांच्या सार्वजनिक कार्याला सुरुवात झाली. हंटर वृत्तपत्र, सत्यशोधक मंडळी, आर्यसमाज आदी घरात घडणाऱ्या चर्चांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, विचारावर झाला. त्यांची चिकित्सावृत्ती वाढली. सामाजिक दृष्टिकोन तयार झाला. समाज परिवर्तन, समाज प्रबोधन, समाज जागृती यासाठी आजन्म कार्यरत राहण्याचे त्यांनी ठरवले.दासराम जाधव,अहिताग्नी राजवाडे ,पंडित सातवळेकर ,महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील ,गाडगे महाराज आदी अनेक दिग्गजांशी त्यांचा परिचय झाला.

वडिलांकडून समाज सुधारणेचा वसा व वारसा घेतलेल्या माधवरावांनी हरिजनांवरील अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी सातत्याने कार्य केले.१९३२ साली त्यांनी हरिजनांसमवेत नरसिंहवाडीला भेट देऊन तेथील दत्त पादुकांना स्पर्श केला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवून देण्याचे काम केले. सत्यशोधकानी जातीची भाषा सोडून सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार केला पाहिजे असे त्यांचे मत होते. अखिल भारतीय सत्यशोधक परिषदेचे ते काही काळ अध्यक्षही होते.कोल्हापूरातील कामगार चळवळ ,प्रजा परिषद चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक चळवळी बरोबरच त्यांनी धार्मिक-सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले. प्रजा परिषदेच्या चळवळीतून त्यांनी त्या भागातील तमाम शेतकऱ्यांना जागृत केले.त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली. ‘ दुनियेचा तूच खरा मालक आहेस ‘ हे शेतकऱ्यांना ते सांगत असत. त्यांनी सोप्या भाषेत केलेल्या प्रबोधनाचा फार मोठा प्रभाव लोकांवर पडत असे. त्यांच्यातील समाजसुधारक हा बंडखोर क्रांतिकारी विचारांचा होता. १९३७ ला त्यांनी प्रजा परिषद स्थापन केली. ब्रिटिश शासनाने मोठ्या पगाराच्या नोकरीसह दाखवलेली अनेक आमिषे त्याने धुडकावून लावली. सर्वसामान्य माणसांसाठी आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही पत्करला. भाई माधवराव बागल हे अव्वल दर्जाचे समाजप्रबोधनकार होते.

देव आणि धर्म या संकल्पनांनी बहुजन समाजाची आर्थिक व बौद्धिक हानी झाली आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मंदिर प्रवेशाच्या चळवळीपेक्षा मंदिरावर बहिष्काराची चळवळ केली पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली. अर्थात परिस्थितीची गरज ओळखून त्यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ केली. तिचे नेतृत्व ही केले. पण या चळवळीतून देव धर्माबाबत अंधश्रद्धा फैलावणार नाही यावर त्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवले. कारण, ‘ देऊळ बोकांडी बसला की दैववाद आला. दैववाद आला की माणूस परावलंबी झाला.त्याचं कर्तुत्व नाहीस झालं. देव मानला की दगड मोठा ठरतो आणि माणूस नीच ठरतो. देव मानला की समता गेली. समता गेली की समाजवाद गेला.समाजवाद गेला की लोकशाही गेली. पर्यायाने भारतीय राज्यघटना संपुष्टात आली. ‘असे ते म्हणत असत.

भाई माधवराव बागल आपले विचार मांडताना कोण दुखावेल आणि कोण गोंजारले जाईल याची तमा बाळगत नव्हते. त्यांच्या प्रत्येक विचारामागे जनसामान्यांबाबतचा कळवळाच होता.कार्ल मार्क्सचा समाजवाद आणि गांधींची अहिंसा या दोहोंवर त्यांची निष्ठा होती. कलावंत ,समाजसुधारक, राजकारणी, साहित्यिक अशी विविधांगी स्वरूपाची त्यांची ओळख होती. त्यांनी पन्नासावर पुस्तकेही लिहिली. भाई माधवराव बागल राजकारणात गेले नसते तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते कधीच झाले असते असे आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते. यावरून त्यांच्या लेखनाचे महत्त्व अधोरेखित होते.

‘ कला आणि कलावंत ‘या ग्रंथात त्यांनी जगातील प्रख्यात चित्रकारांची शब्दचित्रे रेखाटली. ‘कोल्हापूरचे कलावंत ‘या ग्रंथात त्यांनी कोल्हापुरातील एकवीस कलावंतांची शब्दचित्रे रेखाटली.तसेच पोट्रेटस,पेंटिंग ,लँडस्केप, आणि कंपोझिशन या विषयावरील लेखही लिहिलेले आहेत. जुलुम, जिव्हाळा, संस्थानी राजवटर,संसार हे कथासंग्रह त्यानी लिहीले. सत्याग्रहातून सहकार्याकडे ,लग्न बंधन की तुरुंगवास, समाजसत्ता की भांडवलशाही, संस्थानिक – संस्थानी प्रजा व फेडरेशन, सुलभ समाजवाद ,मार्क्सवाद-लोकशाही समाजवाद व निधर्मी राज्य अशी वैचारिक पुस्तके त्यांनी लिहिली.तसेच माझ्या आवडत्या पाच व्यक्ती, माझे यशवंतराव, माझा परिवार भाग-१ व २, जीवन प्रवाह भाग१-२-३ ही चरित्रात्मक व आत्मचरित्रात्मक पुस्तकेही त्यांनी लिहिली. आपल्या वडिलांच्या लेखांचे ‘ खंडेराव गोपाळराव बागल यांचे निवडक लेख ‘ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले. भाई माधवराव बागल यांच्या कामाबद्दल त्यांना भारतसरकारने ‘पद्मभूषण ‘पुरस्काराने सन्मानित केले होते. महाराष्ट्र शासनाने ‘ दलित मित्र ‘पुरस्कार दिला होता. शिवाजी विद्यापीठाने सन्माननीय ‘ डि लीट’ ही पदवी दिली होती. ६ मार्च १९८६ रोजी ते कोल्हापुरातच कालवश झाले. अखेरच्या काळात ते शिवाजी विद्यापीठातच वास्तव्याला होते.त्यांचा ग्रंथसंग्रह शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात जतन करण्यात आला आहे. भाई माधवराव बागल बागल विद्यापीठाच्या वतीने यांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न होत असतो.अशा या थोर विचारवंत समाज प्रबोधनकाराला विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली तेहतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.)


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *