बारावी परीक्षा सुरळीतपणे सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा पहिला पेपर आजपासून सुरळीतपणे सुरू झाला. कोरोनामुळे परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान तपासणी करूनच विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मास्क व सॅनिटायजर व कोवीड 19 आरोग्य विषयक सुचनांचे पालन करुन परीक्षेला सुरूवात करण्यात येत आहे. यावर्षी ज्या कनिष्ट महाविद्यालयात अथवा शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. प्रश्नपत्रिका संच यावर्षी प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या समोरच उघडण्याच्या सुचना परीक्षा मंडळाने दिलेल्या आहेत. विद्यार्थी, पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास व घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे. कोव्हीड 19 मुळे या वर्षी परीक्षा केंद्राची संख्या वाढली आहे.