महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा यावर्षीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. अजित पवारांनी सिंचन क्षेत्राला विशेष योजना जाहीर करून भरपूर निधीची तरतूद केल्याचे सांगत महिला, आरोग्य, विद्यार्थी, मागासवर्गीय, गृह अशा विविध घटकांना वाढीव निधी दिल्याच्या घोषणा केल्या.
सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव यावेळी मांडला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. तर सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी केले आहे. त्यामुळे सीएनजी आणि सोने स्वस्त होणार आहे.
पीक कर्ज वाढ, फळबाग, सिंचन प्रकल्प, भरड धान्य ,शेळी प्रकल्प, कृषीपंप, पशुधन, महिला शेतकरी यांना निधी जाहीर केला. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला. संभाजी महाराजांचे हवेलीत स्मारकासाठी २५० कोटींची तरतूद केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळेल. फळबाग योजनेत ड्रॅगन फ्रुट आणि अव्हाकाडो या परदेशी फळाचा समावेश केला. मुंबईबाहेर ५० खाटांची ट्रॉमा केअर सेंटर उभारणार. टाटा कर्करोग संशोधन रुग्णालयाला रायगड जिल्ह्याच्या खानापूर येथे जमीन दिली जाईल. आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. पुणे शहरात एकाच छताखाली सर्वप्रकारच्या सुविधा देणारी इंद्रायणी मेडासिटी ३०० एकरावर उभारण्यात येईल. नालेसाफाईसाठी नवी यंत्रे घेतली जातील. अंगणवाडी सेविकांसाठी मोबाईल सेवा दिली जाईल. मुंबई बाहेरील म्हाडाच्या झोपडपट्ट्यांच्या सुधारणेसाठी १०० कोटींचा विशेष निधी ठेवला जाणार आहे. मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा होईल. भाऊचा धक्का ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा दर कमी केले जातील.
यंदाच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
शिर्डी विमानतळाला १५० कोटींचा निधी मंजूर केला.
शिवडी-नाव्हाशिवा सागरी सेतू २०२३ पर्यंत सुरु करणार.
३ लाख ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य.
५ हजार इलेक्ट्रिक पार्किंग केंद्र उभारणार.
शालेय विकासासाठी २ हजार ३५४ कोटी रुपये निधी.
हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देणार.
कोरोना महामारीनंतर राज्याच्या उद्योग क्षेत्राने मोठी उभारी घेतली असून या क्षेत्रात ११.९ टक्क्यांची तर सेवा क्षेत्रात १३.५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
राज्याचे २०२२१-२२ मधील स्थूल राज्य उत्पादन ३१,९७,७८२ कोटी अपेक्षित आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा, या महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसंच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाईल.
एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तरतूद
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल. परिवहन विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.