जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला
विशेष वॅगनने दिल्लीला रवाना
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन!
- सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!
सांगली, दि. 19 : शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 25 टन पेरू, टोमॅटो व दहा हजार अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली. आज पहाटे सव्वा पाच वाजता “दर्शन एक्सप्रेस” या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठविण्यात आली.
मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे व समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून “दर्शन एक्सप्रेस” रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
प्रायोगिक तत्वावर फळे, भाजीपाला पाठविला असून तो पुढील काळात बाजार मागणीनुसार दररोज किंवा आठवड्यातून एकदा रेल्वेने पाठविण्याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व रेल्वे विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते. त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचे ही आभार मानले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार व त्यांचे सर्व अधिकारी श्री. पाटील, श्री. माळी आदींनी यासाठी मेहनत घेतली.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.