संघर्षनायक मीडिया विशेष
ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्या! – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश
मुंबई, (प्रतिनिधी): मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या कामाला राज्यात मोठा वेग आला असून, आतापर्यंत या अभियानात ७२ हजार ९७ घरकुले पूर्ण झाली आहेत. ही लक्षणीय प्रगती साधल्याबद्दल ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. मात्र, यापुढे भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री गोरे यांनी दिले आहेत.
ग्रामीण गृहनिर्माण कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अभियानात ७२ हजारांहून अधिक घरकुले पूर्ण
मंत्री गोरे यांनी यावेळी अभियानातील कामांवर समाधान व्यक्त केले. अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) टप्पा १ आणि २०२४-२५ पूर्वीच्या राज्य योजनांमधील १७,८५९ घरकुले, तसेच PMAY-G टप्पा २ आणि २०२४-२५ पासूनच्या राज्य योजनांमधील ५४,२३८ घरकुले, अशी एकूण ७२,०९७ घरकुले पूर्ण झाली आहेत. याव्यतिरिक्त, सध्या सुमारे ३० लाख घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.
भूमिहीन लाभार्थ्यांसाठी विशेष लक्ष
राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला पक्के घर देण्याच्या उद्दिष्टाकडे ग्रामविकास विभाग वेगाने वाटचाल करत असताना, मंत्री गोरे यांनी विशेषतः भूमिहीन लाभार्थ्यांच्या प्रश्नावर भर दिला. ते म्हणाले, “घरकुल पूर्णतेचा वेग अधिक वाढवावा. काम करताना लाभार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवावा आणि भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष द्यावे.” अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत ६,०७५ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मनरेगा आणि सौरऊर्जेवर भर
मंत्री गोरे यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या:
- मनरेगा लाभ: घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा (MGNREGA) योजनेंतर्गत मजुरीचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही तातडीने करावी.
- सौर ऊर्जा: PMAY-G टप्पा २ मधील घरकुलांना प्रधानमंत्री सूर्यघर योजना/अन्य योजनेतून सौर ऊर्जेचा लाभ देण्यावर भर देण्यात यावा.
- नाविन्यपूर्ण उपक्रम: ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात नाविन्यपूर्ण (Innovative) उपक्रम राबवावेत.
अभियानातील पुढील उद्दिष्टे: १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जुनी आणि नवीन घरकुले पूर्ण करणे, सर्व पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे आणि सर्व मंजूर घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे, ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
ग्रामीण महाराष्ट्र सक्षम करण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असून, मंत्री गोरे यांनी दिलेल्या निर्देशांमुळे भूमिहीन आणि वंचित लाभार्थ्यांचे पक्क्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.