तेरी मेहरबानियाँ! मालकाच्या मृत्यूनंतर ९ दिवसांपासून निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच; सोलापूर जिल्ह्यातील काळीज हेलावणारी घटना
सोलापूर: कुत्रा हा केवळ प्राणी नसून तो आपल्या मालकाचा सर्वात जवळचा आणि निष्ठावान मित्र असतो, याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातून आलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने दिली आहे. वडवळ येथील एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या स्मशानभूमीत हा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून आहे.
नेमकी घटना काय?
वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार (वय ५५) यांचा अल्पशा आजाराने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मृत्यू झाला. कुटुंबाने आणि नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. तानाजी पवार यांचा हा पाळीव कुत्रा त्यांच्यावर अतिशय प्रेम करत असे आणि तो नेहमीच त्यांच्यासोबत सावलीसारखा असायचा.
मालकाचे पार्थिव स्मशानभूमीत दहन झाल्यानंतर हा निष्ठावान कुत्रा तिथून हललाच नाही.
मालकाच्या आठवणीत स्मशानभूमीतच मुक्काम
ज्या ठिकाणी तानाजी पवार यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले, त्या जागेपासून हा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून जराही हललेला नाही.
- मालकाच्या अचानक जाण्याने या मुक्या प्राण्याला मोठा धक्का बसला आहे. त्याचे उदास आणि हताश झालेले रूप पाहून गावातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
- पवार कुटुंबातील सदस्यांनी आणि काही ग्रामस्थांनी त्याला अनेकवेळा स्मशानभूमीतून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण हा कुत्रा त्या जागेवरून जायला तयार नाही. तो पुन्हा स्मशानभूमीत परत येतो आणि शांतपणे बसून राहतो.
- या कुत्र्याचे मालकावरील हे अलोट आणि जिवापलीकडील प्रेम पाहून वडवळ येथील नागरिक गहिवरून गेले आहेत. निष्ठा आणि प्रामाणिकतेची ही अनोखी कहाणी सध्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे.
“कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी” या म्हणीचा जिवंत अनुभव देणारी ही घटना, माणूस आणि प्राण्यांमधील निखळ प्रेमाचा आणि निष्ठेचा एक मोठा संदेश देऊन जाते. वडवळच्या स्मशानभूमीतील हे चित्र पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.