महाराष्ट्र ब्रँडच्या बाटल्यांमध्ये ‘गोव्याची दारू’; कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्काकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथे केन कंपनीसमोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता अवैध व्यवसाय
कोल्हापूर: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात विक्रीस असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये गोवा बनावटीचे मद्य भरून, त्यावर बनावट बुचे लावून जादा दराने विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, तीन वाहनांसह एकूण १६ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कडक तपासणी सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथे केन कंपनीसमोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा अवैध व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, तिथे महाराष्ट्रातील नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये गोव्यातील स्वस्त मद्य भरण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले.
तिघांना अटक, वाहने जप्त
या प्रकरणी पोलिसांनी खालील संशयितांना अटक केली आहे:
१. अवधूत राजेंद्र पिसे (वय ३०, रा. दानोळी)
२. संतोष कुमार कांबळे (वय ३०, रा. कोंडीग्रे)
३. दत्तात्रय भीमराव बंडगर (वय ४९, रा. सांगली)
जप्त केलेला मुद्देमाल
- मद्य: विविध ब्रँडच्या आणि पुनर्भरित केलेल्या एकूण ३७५ बाटल्या.
- वाहने: एक ह्युंदाई सेंट्रो, टाटा नेक्सॉन आणि मारुती स्विफ्ट डिझायर.
- इतर: मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि मोबाईल संच.
या सर्वांची एकूण किंमत १६,९५,५५० रुपये इतकी आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाची कामगिरी
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये निरीक्षक सदानंद मस्करे, महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे व इतर जवानांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे करत आहेत.
