
रत्नागिरी:
“राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) रात्रंदिवस सेवा देणाऱ्या आशा व गटप्रवर्तक महिलांना वयाची ६० वर्षे पूर्ण होताच सेवेतून मुक्त करणे हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा भंग आहे. शासनाने त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे, अन्यथा दरमहा ५००० रुपये पेन्शन व ग्रॅज्युटी द्यावी. या मागण्या मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेऊ,” असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने दिला आहे.
या संदर्भात संघटनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आटले यांना सोमवारी सविस्तर निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी, हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि आरोग्य मंत्र्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे.
दुहेरी निकष आणि शोषणाचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ६५ वर्षांपर्यंत सेवा देऊ शकतात, मग तळागाळात आरोग्याची सेवा देणाऱ्या महिलांना ६० व्या वर्षी कामावरून काढणे हा सामाजिक अन्याय आहे. अनेक ठिकाणी आशा स्वयंसेविकांना ऑनलाइन सर्वे, डेटा एन्ट्री आणि ॲप आधारित कामांसाठी सक्ती केली जाते. काम न केल्यास कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जातात, हा प्रकार ‘पॉश’ (POSH) कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचे संघटनेने नमूद केले.
प्रलंबित मागण्यांचा पाढा
संघटनेने शासनासमोर खालील प्रमुख मुद्दे मांडले आहेत:
- साधनसामग्रीचा अभाव: ऑनलाइन कामासाठी अँड्रॉइड मोबाईल आणि डेटा पॅक दिला जात नाही.
- हक्कांची पायमल्ली: प्रसूती रजा, किमान वेतन आणि जननी सुरक्षा योजनेचा मोबदला वेळेवर मिळत नाही.
- अतिरिक्त ताण: शहरी भागात कमी कर्मचाऱ्यांवर हजारो लोकसंख्येचा भार टाकला जात आहे.
- पारदर्शकतेचा अभाव: वर्षानुवर्षे कामाच्या मोबदल्याच्या वेतन चिठ्ठ्या (Salary Slips) दिल्या जात नाहीत.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आटले यांनी सांगितले की, “जिल्हा स्तरावरील ज्या काही प्रलंबित मागण्या असतील, त्या तातडीने पूर्ण केल्या जातील. तसेच, राज्य स्तरावरील मागण्यांचा प्रस्ताव तातडीने आरोग्य विभागाकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल.”
या शिष्टमंडळात कॉ. शंकर पुजारी, सुमन पुजारी, स्वाती वरवडेकर, वृषाली साळवी, वैष्णवी तांबट, ललिता राऊत, वर्षा मोहिते, संजीवनी तिवडेकर, सुष्मिता जाधव, अश्विनी बाटले, श्रेया लांजेकर, पूजा पोद्दार, भाग्यश्री मोरे, सायली कदम आणि अपूर्वा कडू यांसह अनेक आशा व गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
