कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली अटकही बेकायदा असल्याचा दावा करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. मंगळवार 22 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता हायकोर्ट आपला निकाल देणार आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयात मलिक यांची बाजू अॅड. अमित देसाई यांनी मांडली. तर ईडीकडून मलिक यांची अटक ही कायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला असून येत्या मंगळवारी निकाल जाहीर करणार आहे. दरम्यान, याआधी मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केले होते. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. तसेच नंतर मलिक यांना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.