डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीतून
सामाजिक सलोख्याचे दर्शन
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
संघर्षाला अपरिहार्य मानून सलोख्याला तिलांजली दिल्या जात असल्याचे सध्य स्थितीत दिसून येत असल्याने सामाजिक भान राखून सामाजिक सलोखा राखण्याची गरज आहे.
सलोखा वृद्धिंगत व्हावा, यासाठी संमती व सामंजस्य या दोहोंची मदत गरजेची असते. समाज ही धारणाच मुळात टिकून आहे किंवा राहते, ती सलोख्यावर. सामाजिक सलोखा नितांत गरजेचाच. माणसांची धुमसणारी मने आणि स्वार्थ यांतून या सलोख्याला सुरुंग लावण्याचाही प्रयत्न होतो. मात्र, सलोखा टिकवून ठेवण्यासाठी समूहवादी संहिताच कामी येते. अशांत समाजाला सलोखाच शांत करू शकतो. सलोख्याला शांतीची भूक असते; परंतु सलोख्यातून शांतताही प्रस्थापित होते. म्हणून सलोखा सुव्यवस्थेचे माध्यम असतो.
सामाजिक सलोखा कशी राखता येऊ शकते,सामाजिक सांमजस्य कसे प्रस्थापित करता येऊ शकतो याचे खरे दर्शन व प्रत्यय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतुन दिसून आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी झाली. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. मिरवणुका निघाल्या. थाटामाटात जयंतीचा उत्सव पार पडला. या सगळ्या उत्सवात एक सामाजिक सलोखा जपणारी गोष्ट अधोरेखित झाली. या गोष्टीचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. घटना आहे, चेंबूरमधली (Chembur). ही घटना पाहिल्यानंतर सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न नेमका कसा, केला जातो, हे अधोरेखित झालंय. आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीत डीजे वाजवला जात होता. अशातच, अचानक अजान सुरु झाल्याचा आवाज ऐकू आला. हे कळताच मिरवणुकीतील लोक काहींनी पुढाकार घेतला. मिरवणुकीतील डीजे थांबवला. अजान सुरु असेपर्यंत डीजेचा आवाज पूर्ण पणे थांबवण्यात आला. आणि सामाजिक सलोख्याचा तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वधर्मसमधाव या विचारांचा वारसा जपण्याचं आवाहनही करण्यात आलं.
नेमकं चेंबूरमध्ये कुठं?
हा सगळा प्रकार नेमका चेंबूरमध्ये कुठे घडला, असाही प्रश्न आता विचारला जातो आहे. चेंबूरच्या महात्मा फुले नगर नंबर 1 मधून मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक पी.एल. लोखंडे मार्ग इथं निघालेली. दरम्यान, मध्येच अजान सुरु झाली.
वाटेत असलेल्या एका मशिदीमध्ये काही मुस्लिम बांधव आपली नियमित प्रार्थना करत होते. यावेळी अजान सुरु झाल्यामुळे मिरवणुकीच्या आयोजकांनी डीजे बंद केला. तसंच सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियात व्हायरल झाली असून अनेकांनी या मिरवणुकीत करण्यात आलेल्या कृतीचं कौतुक केलंय.
म्हणून घटनेला महत्त्व!
गुढीपाडव्याला झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि या भोंग्यावरुन दिली जाणारी अजानची प्रार्थना यावर आक्षेप नोंदवला होता. मशिदींवरील भोंगे उतरवण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. तसंच मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालीसेनं उत्तर देऊ, असा इशाराही दिला होता. आता 3 मेपर्यंत राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. सरकारलाही याबाबत पावलं उचलण्यास सांगितलं आहे. अन्यथा मशिदींच्या भोंग्यांना मनसे स्टाईल हनुमान चालीसेनं उत्तर देऊ, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.
राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेवरुन राजकारण तापलेलं होतं. अनेक राजकीय प्रतिक्रियाही यावरुन उमटल्या होत्या. दरम्यान, या सगळ्यात घडामोडींच सामाजिक सलोख जपणारी ही घटना सगळ्यांचच लक्ष वेधून घेते आहे.
९५६१५९४३०६