” प्रबोधन प्रकाशन ज्योती “च्या ४२५ व्या अंकाचे प्रकाशन
इचलकरंजी ता. १७’ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाच्या ४२५ व्या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक चौसाळकर आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ.भारती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जानेवारी १९९० पासून गेली चौतीस वर्षे अतिशय नियमितपणे होणाऱ्या या मासिकाने महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत मौलिक कामगिरी केली आहे आणि यापुढेही ते करत राहील अशी ग्वाही देत प्रबोधन-परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पाठीराख्यांनी या मासिकाचे वर्गणीदार वाचक व्हावे असे आवाहन डॉ.अशोक चौसाळकर यांनी केले.
प्रा. डॉ. भारती पाटील म्हणाल्या,’प्रबोधन प्रकाशन ज्योती’मासिकाचे सलग सव्वाचारशे अंक प्रकाशित होणे आणि त्याद्वारे तब्बल सव्वीस हजारांवर छापील पृष्ठांचा प्रबोधनपर मजकूर देणे हे अतिशय महत्त्वाचे काम समाजवादी प्रबोधिनीने केले आहे. या मासिकासाठी सातत्याने लिहिणाऱ्या सर्व लेखकांचे तसेच या मासिकासाठी मदत करणाऱ्या सर्व घटकांचे योगदान या वाटचालीत मोठे आहे. समाजवादी प्रबोधिनी या सर्वांप्रती कृतज्ञ आहे.
समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व या मासिकाचे मुख्य संपादक प्रसाद कुलकर्णी म्हणाले, प्रबोधन प्रकाशन ज्योती या लोकप्रबोधनासाठी सुरू असलेल्या मासिकाचा ‘ पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना ‘हे मोठे वैशिष्ट्य आहे. या मासिकावर अभ्यासकांनी मुंबई विद्यापीठात पीएचडी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रबंध सादर करून पडव्या प्राप्त केल्या आहेत. या मासिकाचा समावेश अनेक विद्यापीठांच्या भाषा व सोशल सायन्स या संदर्भ यादीमध्ये आहे.गेल्या ३४ वर्षांमध्ये विविध विद्यापीठातील शेकडो प्रबंधामध्ये या मासिकाचा उल्लेख’ संदर्भ ‘म्हणून केला गेला आहे याचा विशेष आनंद आहे. अन्वर पटेल यांनी आभार मानले.