छ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे?-डॉ.विकास पाटील

<em>छ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे?</em>-डॉ.विकास पाटील

छ.संभाजीराजे चरित्रातून आज आपण काय शिकावे?
-डॉ.विकास पाटील,सैनिक टाकळी,कोल्हापूर.

छत्रपती संभाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाला जगाच्या इतिहासात तोड नाही.
शंभूचरित्र हे पदोपदी प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहे.शंभूचरित्रातून आज आपणाला लाखो मूल्ये शिकता येण्यासारखी आहेत.शंभूराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून,शिवरायांनी स्थापलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण केले.छत्रपती संभाजी राजांचा इतिहास अनेक क्रांतिकारक घटनांनी ओतप्रोत भरलेला आहे. संभाजीराजांच्यावर अनेक संकटे चालून आली.असंख्य शत्रूंचा महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला; म्हणजे संभाजी महाराज संकटसमयी रडणारे नव्हते तर लढणारे होते. आज कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी या संकट समयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शंभूचरित्रातून घ्यावी.आजचा तरुण हतबल, निराश होत चालला आहे.आजच्या तरुणांपेक्षा कितीतरी अधिक संकटे राजांच्यावर आली होती; त्याप्रसंगी राजांनी निर्भीडपणे संकटांवर मात केली.संभाजीराजे प्रयत्नवादी होते, निराशावादी नव्हते. शंभूचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे.

संभाजीराजे दोन वर्षे वयाचे असताना आई सईबाईंचे निधन झाले.पण सावत्रमातांनी राजांना पुत्रवत सांभाळले. जिजाऊमाँसाहेबांनी राजांना संस्कृतचे शिक्षण दिले.बालवयातच राजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवले.
वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे मिर्झाराजे जयसिंगाकडे पुरंदर तहापासून संभाजीराजांच्या राजकारणाला सुरुवात झाली.मृत्यूपर्यंत म्हणजे वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत. राजांनी अन्याय,अत्याचाराविरुद्ध आपली तलवार गाजवली.संभाजीराजे पराक्रमी होते.राजे ज्याप्रमाणे हातात तलवार घेऊन लढणारे होते तसेच हातात लेखणी घेऊन दर्जेदार लेखन करणारे महान लेखक, साहित्यिक होते.
कुमारवयात वयाच्या 14 व्या वर्षी संभाजीराजांनी संस्कृतमध्ये “बुधभूषण” आणि हिंदी भोजपुरी भाषेत “नखशिख,सातशतक आणि नायिकाभेद” हे चार ग्रंथ लिहिले.
बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना,असा अर्थ असलेला “बुधभूषण”!
या ग्रंथात शंभूराजांनी राजनीती केवळ सांगितली नाही तर स्वतः आचरणात आणली. राजाने सर्व दोष टाळलेच पाहिजेत;हे सांगताना शंभूराजांनी सातदोष हे राजाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे अध्याय 2, श्लोक 422 मध्ये मांडले.वाचकासाठी ते मुद्दाम येथे देत आहे.ते सातदोष असे.-
1.कुणालाही फार टोचून बोलू नये.
2.कुणाशीही कठोर बोलू नये.
3.संरक्षणाशिवाय राजाने राज्यापासून दूर जावू नये.
4.राजाने मादक द्रव्य, दारू,गांजा,अफू असे पदार्थसेवन करू नयेत. (नशाबंदी-व्यसनमुक्ती).
5.राजाने जनानखाना बाळगू नये.परस्त्रीचा मातेसमान सन्मान करावा.
6.राजाने गरीब,जंगली वा पाळीव प्राण्यांची हत्या करूच नये.
7.राजाने द्युत-जुगारापासून दूर रहावे.
छत्रपती संभाजीराजे बुधभूषण ग्रंथात लिहितात की,
जे प्रयत्नवादी असतात, तेच खरे मर्द असतात.
जे दैववादी असतात, ते नामर्द असतात.
संभाजीराजांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर बहुभाषिक असावे,ही प्रेरणा शंभूचरित्रातून मिळते.

छत्रपती संभाजीराजे चारित्र्यसंपन्न होते.शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणी प्रमाणे आदर केला.शिवरायांप्रमाणेच आपल्या राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली.महाराणी येसूबाईंचा त्यांनी आदर सन्मान केला. त्यांना स्वराज्याचे सर्वाधिकार दिले. त्यांच्या नावांचा शिक्का तयार करवून घेतला.
“श्री सखी राज्ञी जयति” या नावाने महाराणी राज्यकारभार करू लागल्या.
आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. आपल्या आजीचा, सावत्र मातांचा त्यांनी सन्मान आदर केला. कनिष्ठ बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने वागविले. त्यांचे तीन विवाह लावून दिले. इतिहासप्रसिद्ध महाराणी ताराराणी या राजाराम महाराजांच्या महाराणी होत्या. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य छत्रपती घराण्याने केले. छत्रपतींचा वारसा महिलांचा सन्मान करणे. त्यांना संधी देणे, त्यांना स्वातंत्र्य देण्याचा आहे. याचा पाया शिवरायांनी घातला. तो वारसा संभाजीराजांनी चालवला.आज आपण एकविसाव्या शतकाची भाषा बोलतो, खरंच आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे? जी सुरक्षितता शिवशंभू काळात होती, ती सुरक्षितता आज नाही. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शंभूचरित्राची घरोघरी पारायणे करावी लागतील.

संभाजी महाराज निस्वार्थी होते.संभाजी महाराज विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी कधी भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहिला नाही. त्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग केला. संभाजी महाराज भोंदू, बुवा, बापू, भटमुक्त होते. त्यामुळेच महाराज भयमुक्त होते. शंभूराजे यांच्याकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा.

कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजीराजांनी केले. संभाजीराजांनी सव्वातीनशे वर्षापूर्वी गाव सोडले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, फॅक्‍स, ध्वनिक्षेपक इ. अत्याधुनिक साधने नसताना शंभूराजांनी अशक्‍य कार्य शक्‍य केले. आज आपल्या पायाशी-हाताशी असंख्य साधने आहेत. आज खरेतर शंभुराजांची प्रेरणा घेऊन विश्वविजयी होण्याचा संकल्प शंभूजयंतीच्या निमित्ताने केला पाहिजे. छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातून आजच्या शिव-शंभूभक्तांनी,अनुयायांनी लेखनाची,वाचनाची, ज्ञानार्जनाची प्रेरणा घ्यावी.संभाजी महाराज आज येणार नाहीत. आज आले तरी, आपल्या हाती ढाल-तलवार देणार नाहीत. ढाल- तलवारीची लढाई आता कालबाह्य झालेली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे,लेखणीचे, संगणक, माहिती- तंत्रज्ञानाचे आहे.शंभूचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, उद्योग-व्यवसायगड, शिक्षणगड,संशोधनगड, धर्मगड, कला-वाड्मयगड जिंकले पाहिजेत.त्यामुळे संभाजीराजांप्रमाणे घ्या हातात लेखणी आणि लिहा आपला खरा इतिहास.घ्या हातात लेखणी आणि करा विविध विषयावर साहित्यनिर्मिती. ज्ञान-लेखन ही कोणाची मक्तेदारी नाही.ही संभाजीराजांनी आपल्यासमोर फार मोठी प्रेरणा ठेवली आहे. संभाजीराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येक गावात किमान एकतरी लेखक तयार झालाच पाहिजे,हीच खरी संभाजीराजांना आदरांजली आहे.

संभाजी महाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळे(सैनिक) देखील निर्व्यसनी होते. त्यामुळेच संभाजीराजे यशस्वी झाले.व्यसनाधीन कधीच क्रांती करू शकत नाहीत.निर्व्यसनी माणसेच क्रांती करतात. संभाजीराजांच्या चरित्रातून निर्व्यसनीपणा आजच्या तरुणांनी शिकावा.

संदर्भ: छ.संभाजी महाराज,बुधभूषण, अभिमान इतिहासाचा!

आवाहन -🙏
छ. संभाजीराजांच्या 366 व्या जयंतीनिमित्त, ,त्यांनी लिहिलेली,त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके,ग्रंथ वाचून साजरी करावी.त्यांच्या चरित्रातून आपण स्वतः “व्यसनमुक्त” होण्याचा संकल्प करून आपल्याबरोबरच आणखी 366 लोकांना “व्यसनमुक्त” करण्याच्या अभियानात सहभागी होऊया!
छ.संभाजी राजांना यांना विनम्र शिव-अभिवादन !
आणि मानाचा मुजरा!!
सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
**
जय जिजाऊ!
जय शिवराय!!
जय शंभूराजे !!!

डॉ.विकास पाटील,
प्रदेश कार्याध्यक्ष,मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद,महाराष्ट्र.
संचालक,छ.शंभूराजे आधार व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र,
सैनिक टाकळी,जि. कोल्हापूर आणि सांगली.
9881172889.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *