इचलकरंजी – ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करुन जातीय तेढ निर्माण करणार्या योगेश सावंत या समाज विघातक व्यक्तिचा जाहीर निषेध करत संबंधितावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इचलकरंजीतील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
योगेश सावंत नावाच्या जातिवादी व्यक्तीने युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवितो असे प्रक्षोभक विधान करत जातीवाद निर्माण करुन समाजाला भयभीत करण्याची भाषा केली आहे. या आक्षेपार्ह विधानाचा संपूर्ण राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने इचलकरंजीतील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने संबंधित व्यक्तीचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणा प्रश्नाच्या कामात ब्राह्मण समाजातील नेतेमंडळींकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा विरोध न करता जातीय सलोखा कायम रहावा यासाठीही ब्राह्मण समाजाने सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. असे असताना संबंधित व्यक्तीने जाती- जाती मध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करीत सामाजीक स्वास्थ बिघडवण्याचे कार्य केले आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी नैराश्येतुन ब्राह्मण समाजावर निंदनीय व अशोभनीय असे वक्तव्य केले आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घालण्याची गरज असून राज्य शासनाने संबंधितावर तातडीने कायदेशीर कारवाई करुन त्याला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी समाजातील सर्व ब्राह्मण संघटनेतील पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
समस्त ब्राह्मण समाज , इचलकरंजी शहर आणि परिसर