हवेतील तापमान वाढले ; पाण्याची कमतराता भासणार , योग्य नियोजनाची गरज

हवेतील तापमान  वाढले ; पाण्याची कमतराता भासणार , योग्य नियोजनाची गरज

कडक उन्हाळा सुरु होणार आहे. त्यापुर्वीच मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच आता धग जाणवायला लागली आहे. हवामानाचा अंदाज तर गेल्या चारपाच वर्षात तंतोतंत कधीच बरोबर आला नव्हता. अवकाळी पावसाने गेल्या दोन वर्षात दानादाण उडवली होती. 2019 साली महापुराने कहर केला होता. त्यातून आम्ही सावरतो न सावरतो तोच कोरोना नावाच्या महामारीने जगात थैमान घातले. करोडो लोक बळी गेले. त्यानंतर पुन्हा महापूर आणि कोरोना आपत्काळ होताच. आता कुठे कोरोना महामारीतून बाहेर पडलो आणि यंदा पावसाचा पत्ता नेमका कोणी सांगू शकत नाही. अशा परिस्थितीतून आम्ही आता मार्गक्रमण करीत आहोत.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत थंडी होती. मार्च महिना सुरु झाला आणि थंडी संपली. मात्र हळूहळू हवामानात तप्तता वाढण्याऐवजी तापमानात कमालीची धग जाणवू लागली आहे. मनुष्यमात्रासह विश्‍वातील प्राणीमात्राला हवा असणारा वातावरणातील फरक हा नैसर्गिक बदल घडत असतो. निसर्गावर मनुष्यमात्र कधीही राज्य करु शकत नाही. पाऊस पाडण्यासाठी आम्ही नाना प्रकार करुन पाहिले आहेत. पण हवा तेवढा आणि पाहिजे त्या वेळी पर्जन्यवृष्टी आम्ही करु शकलो नाही. हवामानाचा अंदाज मात्र बांधता बांधता हा अंदाजच आम्हाला लावता येईनासा झाल्याचे दु:ख वाटते. हवामानाचा परफेक्ट अंदाज कोणास ठाऊक.
तरीही यंदा होळीला आम्ही एरंड कोणत्या बाजूला पडतोय ते पाहून त्या दिशेने पाऊस येईल असा अंदाज पारंपारीक पध्दतीने आम्ही बांधणार आहोतच. 25 तारखेला होळीपौर्णिमा आहे. त्या दिवशी आम्ही कोणाच्या तरी नावाने बोंब ठोकून आनंद साजरा करणार आहोत. वरुण राजा यंदा तरी लवकर ये रे बाबा अशी प्रार्थना करण्याखेरीज आम्ही कांहीच करु शकत नाही.
नद्यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. दुसरीकडे कूपनलिकांच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार असल्याची चिन्हे आहेत. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असेल आणि तो पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी उपयक्त ठरेल असा कयास जरी आम्ही बांधला असला तरी धरणात पाणी साठा किती आहे हे पावसाळा सुरु झाल्याशिवाय आम्हाला कळणारच नाही. धरणे जरी तुडुंब भरली तरी मिळवले. मौसमी वारे वाहू लागतील तेंव्हा वाहतील. मात्र सद्या हवेतील तापमानाचा पारा भलताच चढत आहे. रात्रंदिवस पंखा चालत आहे. त्यातच विजेच्या बिलांचा बडीमारही आहे. श्रीमंत लोक एअर कुलर आणि एअर कंडीशनरचा उपयोग करुन किमान कांही वेळेपुरते तरी स्वर्गसुखात असल्याचा भास करुन घेतात. गरीबाकडे एसी खरेदीची ऐपत नाही. आणि कोणत्याही योजनेनुसार प्रत्येक कुटुंबाला एसी उपलब्ध व्हावा असे कांही कोणी केलेले नाही.
मार्च महिन्याचा दुसरा आठवडा तापतच गेला. आता तिसरा आठवडा अजून तापणार आहे. चौथ्या आठवड्यात तर धगच धग जाणवणार असल्याची भिती वाटत आहे. मार्चच्या अखेरीस एखादा वळीव झोडपेल अशी अपेक्षा आहे. वळवाने जरी झोडपले तरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याइतपत पाणी साठा होईल अशी शक्यता नाही. अजून एप्रिल, मे दोन महिने आहेत. त्यानंतर मान्सून दाखल झाल्याची खुषखबर मिळेल न मिळेल पण आता मात्र उन्हाची धग सोसतच पावसाची वाट पाहण्याखेरीज आम्ही काय करु शकत नाही. शेतकर्‍याला बिचार्‍याला आकाशाकडे नजर लावून तासनतास बसावे लागणार असल्याचीही भिती वाटत आहे. वळवाचा पाऊस कधी येतोय कोणास ठाऊक. वरुणदेवा वेळेवर तुमचे आगमन होऊ दे, देवा तुमच्यावर राज्य करण्याचे धाडस मानव तरी करणार नाही. त्याच्या सुखासाठी तुम्ही या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *