पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात

-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असेही सांगितले.

विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, बबन शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.

इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टीने विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन- प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल मात्र दुर्घटना घडल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहे. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *