संस्कारांची पेरणी करणारे साने गुरूजी

संस्कारांची पेरणी करणारे साने गुरूजी

संस्कारांची पेरणी करणारे साने गुरूजी

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
Prasad.kulkarni65@gmail.com

मंगळवार ता.२४ डिसेंबर २०२४ रोजी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे यांचा १२५ वा जन्मदिन आहे.महाराष्ट्राच्या जनमानसावर साने गुरुजींचा मोठा प्रभाव होता आणि आजही आहे.त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला आणि ११ जून १९५० रोजी गुरुजींनी आपली जीवनयात्रा स्वतःहून थांबवली.साने गुरुजींची एक थोर साहित्यिक ,कादंबरीकार, गांधीवादी विचारवंत, समाजवादी नेते,आदर्श शिक्षक, थोर संपादक ,अनुवादक, चरित्रकार अशा विविध रूपाने त्यांची ओळख आहे.महाराष्ट्रातील तीन -चार पिढ्यांवर साने गुरुजींचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. गेल्या शतकातील महाराष्ट्रातील निवडक महामानवांमध्ये त्यांचा समावेश होतो.

गुरुजीना केवळ पन्नास वर्षाचे आयुष्य मिळाले. त्यात त्यांनी प्रचंड असे कार्य केले.जर साने गुरुजी आणखी अडीच – तीन दशके जगले असते तर निश्चितपणाने महाराष्ट्राच्या साहित्य ,समाज,राजकारणात काही सकारात्मक स्वरूपाचे बदल झाले असते. कारण गुरुजी गेले त्यावेळी भारत स्वतंत्र होऊन फक्त तीन वर्षे झाली होती. आणि भारतीय राज्यघटना अस्तित्वात येऊन अवघे पाच महिने झाले होते. महाराष्ट्राची स्थापना तर अजून दहा वर्षे दूर होती. म्हणूनच साने गुरुजींचा जात,पात, पंथ, भाषा या सर्व भेदांच्या पलीकडे नेणारा आंतरभारतीचा विचार ते आणखी काही वर्षे हयात असते तर रुजायला अधिक मदत झाली असती यात शंका नाही. कारण गुरुजींचा विचार गुरुजींच्या प्रतिभेने ,व्यापकतेने,उंचीने सामुहिकतेने पुढे नेता आला नाही हे वास्तव आहे. त्यामुळेच आजचे समाजकारण व राजकारण अविचाराने, हेव्यादाव्याने ,व्यक्तिवादाने , गटबाजीने पोखरले गेले आहे. सैद्धांतिक मूल्यांचा ऱ्हास ज्या वेगाने होतो आहे ती गती कमी करण्याचे , क्षीण करण्याचे सामर्थ्य गुरुजींकडे नक्की होते म्हणूनच ते आणखी काही वर्षे हवे होते. अर्थात जर तर ला अनेकदा फार अर्थ नसतो. म्हणूनच जे वास्तव आहे ते स्वीकारून साने गुरुजींचा व्यापक विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच त्याचा खरी आदरांजली ठरेल.

रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला.घरच्या दारिद्र्यामुळे त्यांच्या शिक्षणाची परवड झाली.१८१८ साली ते मॅट्रिक झाले.त्याकाळी स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ जोरात व जोमात होती. साहजिकच गुरुजी त्यात ओढले गेले. भारत मातेला स्वतंत्र करण्याचा ध्यास त्यानी घेतला.अमळनेरच्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये १९२४ साली ते शिक्षक म्हणून रुजू झाल.’ छात्रालय’ हे हस्तलिखित दैनिक त्यांनी सुरू केले.त्याद्वारे तरुणांची मने घडवण्याचे काम केले.

‘श्यामची आई’ पासून ‘भारतीय संस्कृती ‘पर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. बालकांना संस्कारधन देणारे तर प्रचंड लिखाण त्यांनी केले. प्रचंड लेखन केलेले गुरुजी म्हणत’मला लेखणीच्यालालित्या त्यापेक्षा झाडूचे लालित्य जास्त आवडते.’आणि त्याचवेळी ते असेही म्हणत की ‘माझ्या साहित्याला हात लावाल तर माझ्या हृदयाला हात लावाल.’पंडित नेहरूंच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचा ‘भारताचा शोध’ असा उत्तम अनुवाद त्यांनी केला. तसेच टॉल्स्टॉय यांचे कला म्हणजे काय ? डॉ. राधाकृष्णन यांच्या ‘ संस्कृतीचे भवितव्य ‘,महात्मा गांधी यांचे ‘दिल्ली डायरी ‘ , कृष्णा हाथी सिंग यांचे ना खंतं ना खेद अशा अनेक पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला.इतरही अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे अनुवाद गुरुजींनी केले. साने गुरुजींनी जवळजवळ सव्वाशे पुस्तक लिहिली. बेंजामिन फ्रँकलिन, शिशिर कुमार घोष , रवींद्रनाथ टागोर अशा अनेक थोरांची चरित्रे, कथा, कादंबऱ्या अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांनी केले .हे सर्व लेखन त्यांनी देश सेवेसाठी तुरुंगात , समाजकार्यात अथवा विद्यार्थ्यांचे सेवा करण्यात व्यग्र असताना केले आहे.

त्यांच्या लेखनाबाबत मराठी वांग्मय कोशात म्हटले आहे की,’गुरुजींच्या जीवनाशी, जीवननिष्ठाशी ,त्यांच्या आचार विचारांशी त्यांचे सर्वच लेखन दृढपणे निगडित झालेले आहे. राष्ट्रनिर्माणाची पर्यायाने समाजनिर्माणाची प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष राष्ट्रा कार्य करीत असताना जीवनाची सर्व शक्ती त्या कार्यात व उर्वरित ऊर्जा लेखन कार्यात खर्च करणारा, लेखन हा उपासनेच्या विधी मानून लिहिणारा दुसरा लेखक मराठीत नाही . प्रेमळपणा, सत्वशीलता, त्याग , क्षमाशील अनाग्रही वृत्ती, सदाचार व श्रद्धा यांचे आकर्षण हे गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष त्यांच्या सर्व लेखनात प्रतिबिंबित झाले आहेत.सर्वाभूती प्रेमभाव ,ईश्वरावरची श्रद्धा आणि माणसाच्या मूलभूत चांगुलपणावर विश्वास ही गांधीवादाची तत्वे गुरुजींच्या लेखनात आहेत. वाचकांच्या मनावर नैतिक मूल्यांचा खोल ठसा उमटवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. त्यांच्या लेखनाने , शिकवणुकिने, भाषणांनी प्रेरित होऊन अनेकांनी राष्ट्र कार्याला,समाजकार्याला वाहून घेतले .साधी, सोपी छोटी छोटी वाक्यरचना, अंत:करणातील तळमळ, शब्दात ओथंबून भरणारी अशी त्यांची लेखन शैली आहे.’

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी साने गुरुजी कालवश झाल्यावर ‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी ‘हा अतिशय भावस्पर्शी मृत्यूलेख लिहिला होता. अत्रे म्हणतात,’ गुरुजींचे सर्व सामर्थ्य त्यांच्या अश्रूत होते. त्यांच्या सहानुभूतीत होते. अश्रू हाच त्यांचा नारायण होता.वैराण वाळवंटात बागबगीचे आणि मळे पिकवण्याचे सामर्थ्य अश्रूंमध्ये आहे. जगातील सर्व अपूर्णता नष्ट करून त्याला पूर्णतेच्या परमोच्च पदावर पोहोचवण्याची शक्ती अश्रूंमध्ये आहे .अश्रूंच्या बिंदू हाच जीवन ग्रंथाचा पूर्णविराम आहे .हे अश्रूंचे ओजस्वी उपनिषद गुरुजींनी भारताला देऊन ठेवलेले आहे. गुरुजी हे अश्रूंचे महाकवी होते. त्यांच्या सर्व वाङ्मयात सहानुभूतीच्या शुद्ध ,पवित्र आणि निर्मळ रसाखेरीज दुसरा कोणताही रस आढळणार नाही.’

भारतीय संस्कृतीतील विचारांचे भक्कम अधिष्ठान घेऊन सर्वसामान्य माणसाला सुसंस्कृत करण्याचे व्रत घेतलेला भावनाप्रधान लेखक म्हणून गुरुजींचे महत्त्व वादातीत मोठे आहे. गांधीवाद आणि समाजवाद यावर आढळ निष्ठा असणाऱ्या साने गुरुजींनी आंतरभारती पासून राष्ट्र सेवा दला पर्यंतच्या अनेक संस्थांची उभारणी केली .त्यांना प्रेरणा दिली. पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्याची ऐतिहासिक कामगिरीही साने गुरुजींनी केली.साने गुरुजींनी आपल्या आचारातून व विचारातून नैतिकतेचा मापदंड तयार केला. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय क्षेत्रातील आदर्श व व्यवहार यांच्यातील फारकत त्यांना असह्य झाली. परिणामी संवेदनशील मनाच्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःची जीवन यात्रा स्वतः संपवली. पण गुरुजी त्यांच्या साहित्यातून ,लेखनातून झा संस्थात्मक कार्यातून अमर राहिले. साने गुरुजींच्या १२५ व्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे ‘सरचिटणीस’आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच नामवंत लेखक, वक्ता ,कवी,गझलकार आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *